दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । सोलापूर । राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादक्तेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पिक स्पर्धेचे आयोन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
रब्बी हंगामासाठी स्पर्धेत ज्वारी गहू, हरभरा करडई व जवस अशी एकूण 05 पिके समाविष्ट आहेत. पिक स्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. तालुकास्तरावर स्पर्धेक संख्या सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व अदिवासी गटासाटी किमान 05 असावी. पिक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली (भात)किमान 20 आर व इतर पिकांसाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पिक निहाय 300/- रुपये आहे.
रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येणार आहे. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल-प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. या पद्धतीने पिकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल. राज्यपातळीवरील पिकस्पर्धा चालुवर्षी होणार नाहीत. मागील वर्षाच्या तालुकास्तरीय स्पर्धेतील पिकनिहाय पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या शेतक-यांनी जिल्हास्तरीय पिकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.
तालुका पातळीवरील सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रुपये 5000, दुसरे बक्षीस रु 3000, तिसरे बक्षीस रु 2000 आहे. जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रुपये 10,000,दुसरे बक्षीस रु 7,000 तिसरे बक्षीस रु 5,000 आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रुपये 50,000 दुसरे बक्षीस रु 40,000, तिसरे बक्षीस रु 30,000 आहे.
रब्बी हंगाममध्ये दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. हि बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत शेतकरी बंधू व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे सोलापूर यांनी केले आहे.