विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । नवी दिल्ली विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता (टेक्नोफिझिबिलिटी) अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज केंद्रीय मंत्र्यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भातील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली, त्यावेळी खा. अशोक नेते आणि वेदचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. वेदच्या शिष्टमंडळात प्रदीप माहेश्वरी, विनायक मराठे, शिवकुमार राव, नवीन मालेवार इत्यादींचा समावेश होता. अतिशय सविस्तर सादरीकरण यावेळी केंद्रीय मंत्र्यांसमोर करण्यात आले. 14 जून रोजी देवेंद्र फडणवीस हे नागपुरात असताना यासंदर्भातील सादरीकरण त्यांच्यापुढे करण्यात आले, तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांना दूरध्वनी करून या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. तेव्हाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज तर त्यांनी टेक्नोफिझिबिलिटी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा यातून सुरू होईल.

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली, याचा मला आनंद आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ या प्रकल्पासाठी टेक्नोफिझिबिलिटी अहवाल तयार करण्यासंदर्भातील निर्देश अधिकार्‍यांना दिले, यासाठी मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे विदर्भात अनेक नवे उद्योग येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठी सुद्धा त्यामुळे मोठी मदत होईल.


Back to top button
Don`t copy text!