फळबाग ऊस शेतीला पर्याय ठरु शकते, यशस्वी शेतकऱ्यांशी चर्चा करुन बदलाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२१ | फलटण | फळबाग ऊस शेतीला पर्याय ठरु शकते, तथापी ऊसाच्या बरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे, यातून मुबलक उत्पन्न घेण्यासाठी या क्षेत्रात यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांना भेटून चर्चा करावी, आपल्या शेतीमध्ये तसे प्रयोग करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

काळज, ता. फलटण येथे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांच्या शेतावर यशवंत किसान विकास प्रतिष्ठान, सातारा आयोजित व्ही.एन.आर.पेरु लागवड चर्चासत्र व शिवार फेरी या कार्यक्रमास उपस्थित राहुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, तहसीलदार समीर यादव, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष भाऊसाहेब काटे (काटेवाडी बारामती), महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समिती उपाध्यक्ष ब्रम्हदेव दुधाळ, प्रगतशील शेतकरी अजित पवार (शिंदी, ता. माण), पोलीस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे पाटील, सुरवडीचे पोलीस पाटील संतोष पवार पाटील, कराड, इंदापूर, सातारा व फलटण परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी यशवंत किसान विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कदम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व सत्कार केले.

शासनाने फळबाग शेतीमधील शेडनेट वापरासाठी ऑनलाइन नोंदणी सुरु केली असून त्यावर शासन सबसिडी देत आहे, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
अल्पभूधारक शेतकरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर शेतीमध्ये क्रांती घडवून स्वतःचे जीवनमान उंचावून त्यांचे आर्थिक गणित अधिक सक्षम करु शकतात याची ग्वाही देत त्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती, शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या बँकेच्या विविध कर्ज व अन्य योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

चंद्रहास सिंह (जिल्हाधिकाऱ्यांचे वडील) यांनी येथील शेतकऱ्यांनी पेरुचे सुधारित वाण आणण्यासाठी छत्तीसगड किंवा राज्यातील कोल्हापूर, नाशिक वगैरे ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्या क्षेत्रात या सुधारित वाणाचे रोप तयार करावे त्याचा निश्चित चांगला फायदा होईल याची ग्वाही देतानाच आमच्याकडे दिल्ली, उत्तर प्रदेशात ऊसाचे क्षेत्राबरोबर अलीकडे द्राक्ष, पेरु वगैरे फळबाग लागवड सुरु झाली आहे, मात्र महाराष्ट्रातील फळबाग लागवड पद्धती उपयुक्त आहे,आमच्याकडील क्षेत्रात त्याचा वापर करण्याचा प्रयत्न राहिल असे प्रतिपादन यावेळी चंद्रहास सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह व अन्य अधिकाऱ्यांनी शिवार फेरी अंतर्गत निरगुडी येथील कीसनराव कदम यांची द्राक्ष बाग आणि गिरवी येथे रामदास कदम यांची द्राक्ष, डाळिंब, पेरु बागेची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना शेखर सिंह यांनी विवेकानंदपूर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी शेतीचे उत्पादनासाठी प्रवृत्त करुन, महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरी रोपे मागवून घेवून, नंदनवन योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलेल्या प्रोत्साहनातून आज तेथे शेतकरी व ग्राहकांना स्ट्रॉबेरीची आवड निर्माण झाल्याने टप्याटप्याने स्ट्रॉबेरी खालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी निदर्शनास आणून दिले.


Back to top button
Don`t copy text!