स्थैर्य, मुंबई, दि.२: भाजपाला रामराम करून
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत
येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव
राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या
पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग
कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी
माध्यमांशी संवाद साधला, त्यात त्या म्हणाल्या की, प्रसारमाध्यमात
राज्यपाल नियुक्तीसाठी १२ नावं गेलेली आहेत, त्यातलं एक नाव एकनाथ खडसे आहे
अशा बातम्या येत आहेत. यात खडसेंचे नाव येणं हे संतापजनक आहे, भ्रष्टाचारी
नेत्याला पुन्हा राजकारणात राष्ट्रवादी आणू पाहतेय, त्यांच्याविरोधात
निवेदन देण्यासाठी मी राज्यपालांची भेट घेतली. भ्रष्टाचाराविरोधातील
लढ्याला खडसेंसारखे नेते पुन्हा राजकारणात आले आणि सक्रीय झाले तर काहीच
अर्थ राहणार नाही, त्यामुळे माझे निवेदन आणि कागदपत्रे राज्यपालांना दिली
आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे जे भाषा वापरतायेत त्याबद्दल
मी राज्यपालांना निवेदन दिलं आहे. राष्ट्रवादी प्रवेशावेळी जे शब्द वापरले
‘बाई दिली नाही तर मागे लावली’ असं विधान शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख
आणि सुप्रिया सुळे असताना असं केले गेले. एकनाथ खडसेंना काही लाज आहे की
नाही?, त्यांच्या या विधानानंतर मी शरद पवार, सुप्रिया सुळेंना मेसेज केला.
शरद पवारांचा मला फोन आला, खडसेंनी तुमचं नाव घेतलं नाही असं डिफेन्ड
केले. माझं सोडा, पण कोणत्याही बाईबद्दल असं विधान करणं हे योग्य वाटतं का?
असा सवाल मी शरद पवारांना केल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच
आजतागायत एकनाथ खडसेंच्या विधानावर पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल
झाला नाही, त्यामुळे भविष्यात कोर्टाची लढाई लढावी लागणार आहे. तत्पूर्वी
राज्यपालांकडे मी निवेदन दिलं आहे. राज्यपालांना आणखी काही पुरावे देणार
आहे असं त्यांनी सांगितले.