व्यापारी, खेळाडूंसह नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आज पालकमंत्र्यांची भेट घेणार
स्थैर्य, सातारा, दि. १४ : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गर्दी करण्यास मनाई असल्याने शाहू स्टेडियम गेली चार महिने बंद असून या स्टेडियममध्ये असलेली व्यापारी संकुल देखील परवानगी मिळेपर्यंत बंदच होते. आता काही दिवसांपासून व्यापारी संकुल सुरु झाले व खेळाडू देखील काळजी घेत सराव करु लागले असताना जिल्हा प्रशासनाने शाहू स्टेडियमवर कोरोना हॉस्पिटल व केअर सेंटर सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याला स्टेडियममधील व्यापाऱ्यांसह शहरातील खेळाडू, क्रीडा संघटना, परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा तीव्र विरोध आहे.
शाहू स्टेडियममध्ये कोरोना केअर सेंटर वा हॉस्पिटल सुरु करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे कळताच स्टेडियममध्ये सातारा व्यापारी महासंघाने विरोध दर्शवला असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहे. तर सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह परिसरातील नागरिक तसेच सातारा जिल्हा रिपाइंने शाहू स्टेडियममध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
व्यापाऱ्यांसह क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेत त्यांना निवेदने सादर केली. यावेळी झालेल्या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी स्टेडियमध्ये कोरोना केअर सेंटर सुरु केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडून गेले असून त्यांच्यावर अवलंबवून असलेल्या कामगार वर्गाचेही हाल सुरु आहेत.
सध्या नुकतेच मार्केट सुरु झालेले असताना व रोजीरोटीची व्यवस्था होत असताना आता कोरोना केअर सेंटर स्टेडियममध्ये सुरु झाल्यास त्याचा विपरित परिणाम व्यवसायांवर होईल तसेच समुह संसर्गाचाही धोका उद्भभवू शकतो असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर क्रीडा संघटनांनी देखील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू स्टेडियमवर सरावासाठी येत असून विविध क्रीडा प्रकाराच्या खेळाडूंना सरावासाठी जागाच राहणार नसल्याचे वास्तव मांडत शाहू स्टेडियममध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यास विरोधच दर्शवला आहे.
व्यापाऱ्यांचे नुकसान करु नका
शाहू स्टेडियममध्ये व्यापारी संकुलात 160 विविध प्रकारची दुकाने आहेत. त्या दुकांनामध्ये दीड ते दोन हजार कामगार कार्यरत आहेत. तसेच या परिसरात दररोज 15 ते 20 हजार ग्राहकांची वर्दळ असते. त्यामुळे शाहू स्टेडियममध्ये कोरोना केअर सेंटर सुरु केल्यास तो स्प्रेड होण्याचा धोकाही संभवतो. परिणामी व्यवसाय पुन्हा बंद झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना सोसावा लागेल. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. आता कोरोना केअर सेंटर सुरु करुन त्यांना आणखी संकटात टाकू नका.
संतोष शेडगे, बालाजी मोबाईल, शाहू स्टेडियम, सातारा
मध्यवर्ती ठिकाणी धोका कशाला ?
शाहू स्टेडियम हे मध्यवर्ती ठिकाणी असून सभोवताली बसस्थानक, पोलीस परेड ग्राऊंडसह नागरिक वसाहत आहे. त्यामुळे अशा मध्यवर्ती ठिकाणी कोव्हिड सेंटर करण्यापेक्षा औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळांचे गोडावून पर्यायी म्हणून वापरण्यास हरकत नाही. शाहू स्टेडियमवर कोरोना केअर सेंटर करुन व्यापारी, सातारकरांसह, खेळाडूंची गळचेपी करु नका. आमचा अशा प्रकारे कोव्हिड सेंटर करण्यास तीव्र विरोधच राहील.
दीपक यादव, व्यापारी, शाहू स्टेडियम, सातारा
खेळाडूंचे नुकसान करु नका
एकीकडे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रशासन सल्ले देत असताना खेळाडूंच्या सरावावर गदा आणण्याचे काम करु नका. बॅडमिंटन, क्रिकेटसह इतर खेळांचा सराव नुकताच सुरु झाला आहे. आम्ही काळजी घेत खेळाडूंचा सराव घेत आहे. येथे सर्व स्तरावरील खेळाडू सराव करत असताना अचानक आता शाहू स्टेडियमवर कोरोना केअर सेंटर वा हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याचे कळते. त्याला आमच्या सर्व क्रीडा संघटना व खेळाडूंचा तीव्र विरोधच राहील.
मनोज कान्हेरे, राज्य बॅडमिंटन प्रशिक्षक, खेला इंडिया
दुसऱ्या जिल्हय़ातील रुग्णांसाठी अट्टाहास
शाहू स्टेडियममध्ये कोरोना केअर सेंटर करण्यासाठी आता सुविधा निर्माण कराव्या लागणार असून तिथे डांबरीकरणासह भव्य मंडप टाकून तिथे रुग्णांसाठी बेड उभारण्याचा मानस आहे. मात्र साताऱ्यातील खेळाडूंना मग मैदानच उरणार नाही. त्यातही दुसऱ्या जिल्हय़ातील रुग्णांना येथे ठेवण्यासाठी सोय करण्यात येत असल्याचे कळते. हा अट्टाहास कशासाठी असा खेळाडू व व्यापाऱ्यांचा सवाल असून अगदीच असे मोठे कोरोना केअर सेंटर उभे करायचे असेल तर शहराच्या बाहेर नागरी वस्ती नसलेल्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये ते निर्माण होवू शकेल, असा पर्याय प्रशासनाला देण्यात आलेला आहे.
आज पालकमंत्री, खासदारांशी चर्चा
दरम्यान, शाहू स्टेडियममध्ये कोरोना केअर सेंटर उभारण्यास विरोध असल्याची निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून याबाबत व्यापारी, खेळाडू तसेच क्रीडा संघटना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या चर्चा करुन शाहू स्टेडियमऐवजी अशा प्रकारचे कोरोना केअर सेंटर औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये सुरु करण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.