
स्थैर्य, सातारा, दि. 21 सप्टेंबर : गरबा वदांडिया हा कार्यक्रम हिंदू सणसमारंभाचा भाग असला, तरी गेल्या काही वर्षांत या कार्यक्रमांमध्ये हिंदू संस्कृतीचे पावित्र्य राखले जात नाही. या कार्यक्रमांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असून, समूह गरबा, कपल गरबांमधून बीभत्स रूप पुढे येत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात सातार्यात व्यवसायिक गरब्याला आमचा विरोध राहणार असून, केवळ महिलांसाठी गरबा आयोजित करावा, अशी भूमिका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने आज पत्रकार परिषदेत मांडली. या वेळी संघटनेचे प्रवक्ते अभिजित बारटक्के, शहर प्रमुख अजिंक्य गुजर, तालुका प्रमुख शुभम शिंदे, धनंजय खोले आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांत धार्मिक कार्यक्रमाचे स्वरूप चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. नवरात्रोत्सवात गरबा व दांडिया हा महिलांसाठी होता. मात्र, कालांतराने या कार्यक्रमांमध्ये चुकीचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे सामाजिक व धार्मिक संस्कृती धोक्यात येण्याची शक्यता आहे. आयोजकांनी डिस्को गरबा, समूह गरबा, कपल गरबा यासारखे कार्यक्रम आयोजित करू नयेत.आमचा गरब्याला विरोध नाही. मात्र, हा गरबा व दांडिया केवळ महिलांसाठी असावा. याबाबत आम्ही संघटनेच्या वत्तौने पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना निवेदन देणार असून, गरबा आयोजकांचीही भेट घेणार असल्याचे अभिजित बारटक्के, शुभम शिंदे यांनी सांगितले.
घटस्थापना ते दसरा ’श्री दुर्गामाता दौड’..
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा विभागाच्या वतीने यंदा घटस्थापना (ता. 22) ते दसरा (ता. 2) दरम्यान ’श्री दुर्गामाता दौड’चे आयोजन केले आहे. या कालावधीत पहिले पाच दिवस पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे, तर उर्वरित दिवस शहराच्या विविध भागांत दौड जाणार आहे. यामध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अजिंक्य गुजर यांनी केले आहे.