
दैनिक स्थैर्य । 26 जुलै 2025 । सातारा ।शेतकर्यांसाठी कुमठे परिसरात विकास कामे सुरू आहेत, त्यामध्ये कृपया कोणीही राजकारण आणू नका. आमदार म्हणून मी जर दोन किलोमीटरचा रस्ता तयार केला तर तुम्ही तीन किलोमीटरचा रस्ता तयार करा. परंतु विनाकारण राजकारण करू नका. निवडणुकीपुरते राजकारण ठिक आहे, निवडणुकीत मला मतदान करु नका, परंतु विकासकामामध्ये खोडा घालू नका, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
कुमठे, ता. कोरेगाव येथे कुमठे ग्रामपंचायत, माजी सैनिक संघटना, तानाजीराव जगदाळे विविध कार्यकारी सोसायटी, आ. महेश शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 25 रोजी कुमठे ते जळगाव या यासह आणि आणखी दोन रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार शिंदे बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव कर्पे, ज्येष्ठ नेते हणमंतराव जगदाळे, पोपटराव जगदाळे, उपसरपंच संभाजी चव्हाण, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी अध्यक्ष संतोषआबा जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काटकर, तानाजीराव जगदाळे विकास सोसायटीचे चेअरमन भैय्यासाहेब जगदाळे, जवानसिंग घोरपडे, प्रशांत संपकाळ, किसनराव सावंत, राज जगदाळे, रमेश माने, फरदिन मुजावर, जालिंदर सुतार, दीपक सणस, अमोल माने, संतोष ढाणे, अजित बर्गे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे जीवनमान हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतकर्यांच्या हितासाठी विधानसभा सदस्य झाल्याच्या पहिल्या दिवसापासून या भागातील रस्ते उभारणीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्ती आणि गावात ट्रीमिक्स काँक्रिटचे रस्ते केले आहेत. जोपर्यंत प्रत्येक गावातील आणि वाडी वस्तीवरील शेतात जाणारे पाणंद रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटचे होत नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी ग्वाही आ. शिंदे यांनी दिली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ मला सुंदर घडवायाचा आहे. स्थानिक लोकांना चांगले आरोग्य मिळून शंभर वर्ष ते जगले पाहिजेत. पुढची पिढी अभ्यासात हुशार असून त्याचा फायदा शेतीमध्ये झाला पाहिजे, मात्र ही पिढी मला चिखलात शेतात चालत जात असल्याची पहायची नाही. पाणंद रस्त्यासाठी लागणारा लागणार्या मुरूम आणि खडीला रॉयल्टी घेऊ नये म्हणुन मी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर चर्चा होऊन रॉयल्टी मुक्त रस्ते उभारणीचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू झाला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्त्यांसह पाणंद रस्ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाल्याशिवाय माझी रस्त्याबाबतची लढाई संपणार नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कुमठे गावची माणसे खूप हुशार आहेत. त्यांना कुठे काय मागायचे ते चांगले समजते. आपल्या गायरानातील मुरूम चोरीला गेला तरी चालतो, परंतु आपल्या गावातील रस्त्याच्या विकासासाठी मुरूम मिळू देत नाहीत, ही मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नव्याने तयार होणारा रस्ता हा पूर्णपणे शेतातून होणार आहे. काळवट असलेल्या या भागात पूर्णपणे मुरूम भरावा लागणार आहे. त्यासाठी राजकारण म्हणून या रस्त्याकडे न पाहता सर्वांनी एकत्रित येऊन गावातील मुरुम उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून रस्ता दीर्घकाळ टिकेल आणि दर्जेदारपणे तयार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.आज सर्व रस्ते खूप सुंदर झाले आहेत.
राहुल बर्गे म्हणाले, आ. महेश शिंदे हे सातत्याने विधानसभेत मतदारसंघातील विकासाचे आणि शेतकर्यांच्या हिताचे प्रश्न मांडत आहेत. कृत्रिम फुलांबाबत महत्वपूर्ण जागतिक पातळीवरील प्रश्न उपस्थित करून त्यांनी शेतकर्यांना न्याय दिला आहे. आता आपल्या भागातील फुल शेती करणार्या शेतकर्यांना निश्चितच सोन्याचे दिवस येतील. दुसरे आमदार केवळ विकासकामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपला विकास थांबवून घेऊ नका. कुमठे गावासाठी आज चारही बाजूने भले मोठे आणि प्रशस्त रस्ते झाले आहेत. आज आपण कुठूनही आपल्या गावात येऊ शकतो. हे सर्व श्रेय आ. महेश शिंदे यांना जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रगतशील शेतकरी हणमंतराव जगदाळे व सुधीर जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. पोपटराव जगदाळे यांनी प्रस्ताविक केले. मंगेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी तानाजीराव विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल चेअरमन भैय्यासाहेब जगदाळे यांच्यासह संचालक मंडळातील सदस्यांच्या आमदार महेश शिंदे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कुमठे, जळगाव, भोसे, तडवळे संमत कोरेगाव, चांदवडी, आसरे परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कुमठे गावाचा सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लावा
कुमठे गावाला तीन हजार एकर शेतीचे क्षेत्र आहे. त्याला दीड मेगावॅट विजेची गरज आहे. भविष्यात सूर्यप्रकाशाच्या आधारावर वीज मिळणार आहे. सौर ऊर्जा हेच आपले भविष्य आहे, म्हणून कुमठे येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची गरज आहे. आपल्या शेतीला पुरेपूर वीज जर मिळणार असेल तर या प्रकल्पाला विनाकारण विरोध करु नका. या प्रकल्पाच्या माध्यमातून सलग बारा तास वीस पुरवठा आपल्याला तब्बल 35 वर्षांसाठी मिळणार आहे. निव्वळ राजकारणासाठी आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका. सर्वजण मिळून उद्या ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये एकत्रित या, बसा आणि चर्चा करा. त्यातून मार्ग काढा. आपआपसातील वादविवाद मिटवून कुमठे गावाचा विकास करा, कारण या ठिकाणी आ. महेश शिंदे यांची शेती नाही तर तुमचीच शेती आहे, त्यामुळे तुम्ही चांगला निर्णय घ्या
आमदार महेश शिंदे