स्थैर्य, वाई, दि. 27 : वाई शहर असलेल्या स्मशानभूमीत कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करू नयेत अशी मागणी करणारे निवेदन स्थानिकांनी पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, प्रशासन आपलेच घोडे दामटत आहे. मंगळवारी सायंकाळी स्मशानभूमीत एक रुग्णवाहिका आली. त्या रुग्णवाहिकेत पीपीइ किट घातलेले कर्मचारी पाहून स्थानिक जमू लागले अन तणाव सुरू झाला. प्रशासनाला तेथे येऊन वस्तुस्थिती स्थानिकांना सांगावी लागली. पोलिसांनी परिस्थिती हाताळली. दरम्यान, स्थानिकांनी शासनाने शासकीय जागेत कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत अशी मागणी केली आहे.
वाई शहरात असलेली स्मशानभूमी नागरी वस्ती नजीक आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले तर कोरोनाचा धोका पोहचू शकतो अशी भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी निवेदन देऊन वाई पालिकेला अन्य जागेत अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली आहे. असे असताना वाईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड भिलार येथील युवकाचा विष बाधेने मृत्यू झाला. त्या युवकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका प्रशासनाने रुग्ण वाहिकेतून पीपीइ किट घातले गेलेले कर्मचारी आल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले अन नागरिक तेथे जमा झाले.
नागरिकांनी त्या कर्मचाऱ्यांना हटकत अंत्यसंस्कार करायचा नाही असा विरोध केला. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी लगेच पालिका प्रशासनास ही माहिती कळवली तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मुख्याधिकारी विद्या पोळ, नगरसेवक चरण गायकवाड, महेंद्र धनवे, सतीश वैराट, शिवसेना शहर प्रमुख किरण खामकर आदी तेथे पोहचले. नागरिकांनी प्रचंड विरोध करत मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यावर प्रश्नांची सरबती करत त्यांना भांबावून सोडले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक संजय मोतेकर पोलीस कर्मचारी, आरसीएफ पथक यांनी वेळीच हस्तक्षेप करून योग्यरित्या परिस्थिती हाताळली.
दरम्यान स्थानिक नागरिकांनी शासनाच्या वाई शहराबाहेर एमआयडीसीकडे जागा आहेत तेथे अंत्यविधीसाठी सोय करावी अशी मागणी केली आहे. तर या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी प्रशासनाकडून अधिग्रहित करण्यात आली होती.