स्थैर्य, सातारा, दि ११: खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या विकासाची कमानं आता आगामी आठ महिन्यांसाठी महिला सभापतींवर सोपवल्याचे सोमवारी स्पष्ट झाले . नियोजन बांधकाम आरोग्य महिला बालकल्याण व पाणी पुरवठा विभागाच्या सर्व विभागांना महिला सभापती लाभल्याने नगराध्यक्षांसह पालिकेत महिला राज निर्माण झाले आहे .
आगामी पालिका निवडणुकांचा रंग पाहता शेवटच्या टर्मसाठी उदयनराजे भोसले कोणाला संधी देणार याची प्रचंड उत्सुकता होती . तर नेहमीच्या धक्कातंत्र शैलीत उदयनराजे यांनी पालिकेतल्या महिला नगरसेवकांवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले .विद्यमान आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांचा अपवाद वगळता बांधकाम विभागासाठी सिध्दी पवार , महिला व बाल कल्याण विभागासाठी रजनी जेधे, पाणी पुरवठा विभागासाठी सीता राम हादगे व नियोजन विभागासाठी स्नेहा नलावडे यांनी सकाळी अकरा वाजता नामनिर्देशन पत्र पीठासन अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली . तत्पूर्वी रिक्त जागांची माहिती पालिका सभागृहात आयोजित विशेष सभेमध्ये देण्यात आली . त्यानंतर उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करणे व शिक्षण मंडळाच्या पदसिद्ध सभापतीची घोषणा करणे या प्रक्रिया दुपारी बारा वाजता पार पाडण्यात आल्या . अर्ज माघारीसाठी उमेदवारांना साडेबारा ते पावणे एक या दरम्यान पंधरा मिनिटाची मुदत देण्यात आली . दुपारी एक वाजता पीठासन अधिकाऱ्यांनी पाच विषय समित्यांच्या नूतन सभापतींची घोषणा केली .स्थायी समितीच्या सदस्यपदी निशांत पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे संधी देण्यात आली . नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड दत्ता बनकर यांनी नूतन सभापतींचे अभिनंदन केले .
उदयनराजे भोसले यांच्या सभापती पदाच्या धक्का तंत्रावर आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे . नव्या व जुन्या चेहऱ्यांना शेवटच्या टर्म साठी संधी मिळणार अशा अटकळी होत्या मात्र हे अंदाज उदयनराजे यांनी साफ चुकविले आणि आगामी आठ महिन्यांसाठी सातारा विकास आघाडीच्या विकासाचा रोडमॅप नवीन महिला सभापतींना तयार करण्याचे आव्हानं पेलावे लागणार आहे . नगराध्यक्षाच्या साथीला आता सर्वच महिला सभापतींची फळी उभी राहिल्याने सातारा पालिकेत खऱ्या अर्थाने महिला राज अवतरले आहे .