स्थैर्य, पंढरपूर, दि.२७: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी ही मागणी केली आहे.
अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तसं पत्र लिहिलं आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केलीय. दरम्यान, पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पार्थ पवार यांचं पुनर्वसन केलं जाणार की, भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.