दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच यामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तृळात व्यक्त होत आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या रचनेत येत्या काही दिवसात फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध खात्यांचा आढावा व भाजपा पक्षाच्या खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील विविध दिग्गज नेत्यांसोबत महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार प्रितम मुंडे, खासदार हिना गावीत यांच्यासह माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा यानिमित्ताने सुरु आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा सदस्य म्हणून निवडून येताच निरा देवघरच्या पाणी वाटपावरुन थेट राष्ट्रवादीचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांना आव्हान दिले होते. बारामतीकडे जाणारे पाणी थांबवून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. याचबरोबर मतदार संघातील इतर प्रलंबित पाणी, रेल्वे, रस्ते आदी प्रश्न सोडवण्यासाठी ते वारंवार पाठपुरावा करताना दिसत आहेत. अल्पकाळात आपल्या कार्याची चुणूक दाखवणार्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींनी यापूर्वीही विश्वास दाखवून त्यांना सोलापूर विधानसभा पोटनिवडणूकीची जबाबदारी दिली होती. त्यांनीही ती चोखपणे बजावत त्याठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा विजयश्री खेचून आणला होता. आत्ताही होऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीची जबाबदारी पक्षाने त्यांना सोपवली आहे. त्यामुळे आता होणार्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राजकीय प्रमोशन मिळेल कां? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.