दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । पुणे । शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातून आत्तापर्यंत ३४ हजार ३४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत ८ मे पर्यंत आहे. एकूण ९४ हजार ७०० जणांना प्रवेश देण्यात आला आहे.
आरटीईची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा १ लाख १ हजार ८४६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाइन सोडतीच्या माध्यमातून ९४ हजार ७०० जणांना प्रवेश देण्यात आला. पालकांना एसएमएस पाठवून प्रवेशाबाबत कळविण्यात आले. तसेच, प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी दि. ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, सुरुवातीपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत दि. ८ मेपर्यंत वाढविण्यात आली. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
आत्तापर्यंत सर्व जिल्ह्यांतून ३४ हजार ३४२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अद्याप प्रवेशासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्व जागांवर प्रवेश होतील, अशी चिन्हे आहेत. तसेच, प्रवेशासाठी आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.