दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । कोरेगाव । कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणे, ता. कोरेगाव येथील देशराज येवले यांच्या शेतात उभा करुन ठेवण्यात आलेल्या पोकलेनचे लोखंडी बकेट लागल्याने ऑपरेटर उदयराज शंकर पवार वय २१, रा. तासवडे, ता. कराड याचा जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी सतीश रामचंद्र तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, तासवडे येथील उदयराज पवार हा महेश बाजीराव जगदाळे यांच्या पोकलेनवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. शेंदुरजणे येथे विहीर काढण्यासाठी पोकलेन तेथे नेण्यात आले होते. काम झाल्यानंतर देशराज येवले यांच्या शेतात पोकलेन उभा करण्यात आला होता. मंगळवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास महेश जगदाळे यांनी सतीश रामचंद्र तांबे रा. तासवडे यांच्याशी संपर्क साधून, तुमचा मेहुणा उदयराज पवार याचा पोकलेनचे लोखंडी बकेट लागून मृत्यु झाल्याची माहिती दिली.
त्यानंतर सतीश तांबे, त्यांच्या पत्नी वैशाली तांबे, पवार कुटुंबीय व नातेवाईक शेंदुरजणे येथे पोहोचले. त्यांनी जवळून मृतदेह पाहिला. कोरेगाव पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस पथकाने पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासकामी सूचना दिल्या. याप्रकरणी सतीश रामचंद्र तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.
घातपाताचा संशय; सखोल तपासाची मागणी
कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात उदयराज पवार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तेथे पवार कुटुंबीय व नातेवाईक, कोरेगावातील नातेवाईक युवकांनी गर्दी केली होती. त्यांना उदयराज पवार याचा मृत्यु घातपाताने झाल्याचा संशय आहे, त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांची भेट घेऊन सखोल तपास करण्याची मागणी केली. पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरु असताना पवार याच्या कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.