स्थैर्य, दि.२५: उत्तर प्रदेशात आता महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांची खैर नाही. आता राज्यात ‘ऑपरेशन दुराचारी’ चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दिले आहेत. या अंतर्गत आता महिला आणि मुलींवर बलात्कार, लैंगिक शोषण किंवा इतर प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींचे फोटो भर चौकात लावले जातील. याशिवाय त्यांना मदत करणाऱ्यांचीही नावे सार्वजनिक केली जातील. तसेच, आरोपींना महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून शिक्षा दिली जाईल.
गुरुवारी सीएम योगी आदित्यनाथ यांनी अँटी रोमियो स्क्वॉडचा आढावा घेतला. यावेळी योगी म्हणाले की, ज्याप्रकारे अँटी रोमियो स्क्वॉडने उत्कृष्ट काम केले आहे, आवारागिरी करणारे आणि महिलांसोबत गुन्हे करणाऱ्यांना अद्दल घडवली आहे, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांनी ही मोहीम राबविली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी कठोर स्वरात सांगितले की, महिलांसोबत कोठेही काही गुन्हेगारीची घटना घडल्यास बीट प्रभारी, चौकी प्रभारी, स्टेशन प्रभारी आणि सीओ जबाबदार असतील.