स्थैर्य, सातारा, दि. ०५ : काही दिवसांपूर्वी चीन बरोबर युद्धाचे सावट असताना सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आला होता. त्याचे सर्वत्र जोरदार स्वागतही करण्यात आले होते. मात्र हा बहिष्कार केवळ तोंडीच असल्याचे सातार्यात चायनीज मांज्याच्या जोरदार विक्रीने उघड झाले आहे. शहरातील गुरुवार परज परिसरातील अनेक दुकानात राजरोसपणे या चायनीज मांज्याची जोरदार विक्री होत असल्याचे समोर येत आहे.
सध्या शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी वर्गाकडून पतंग उडवण्याचा छंद जोपासला जात आहे. दुपारनंतर सातार्याच्या आसमंतात अनेक रंगीबेरंगी पतंगांची रेलचेल दिसत आहे. चारभिंतीच्या डोंगरावर तर खास पतंग उडवणार्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा सर्रास चिनी बनावटीचा असून हा अत्यंत चिवट असल्याने याला मोठी मागणी आहे. दरम्यान, अशा चिनी बनावटीच्या मांज्यावर बंदी असतानाही दररोज या मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हातांनी कितीही ताकद लावली तरी हा मांजा तुटत नाही त्याच्या या चिवटपणामुळेच त्याला पतंग उडवणारे प्राधान्य देत आहेत. या चिवट आणि धारदार मांज्यामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. काही वर्षांपूर्वी चिनी बनावटीच्या मांजाने गळा चिरल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी सातार्यातही एका दुचाकीस्वाराच्या कानात असा मांजा अडकल्याने त्याचा कान कापला असल्याची चर्चा होती.
चायनीज मांजा विक्रीला बंदी असताना या मांजाची विक्री कशी होते आहे? याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्यानेच विक्रेते मांजा विकत असणार हे उघड सत्य आहे. मांजामुळे आणखी एखादी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणेचे डोळे उघडणार का असा सवाल उपस्थित होत आहे.