स्थैर्य, पांचगणी, दि. 05 : वाई शहराच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीचा मुख्य गाभा असलेल्या धर्मपुरीच्या परिसरात करोना विषाणूचा बाधित रुग्ण आढळून आल्याने गेले काही दिवसांपासून हा विभाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. येथील बाधित रुग्णाच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे जवळपास 75 दिवसापेक्षा जास्त दिवस धर्मपुरी परिसरातील सर्व व्यापार, व्यवहार बंद आहेत. हा परिसर व्यापारीपेठ आहे. येथील प्रतिबंधित क्षेत्र हे बाधिता पुरते मर्यादित करावे वा कमी करावे, अशी विनंती मागणी या भागातील नागरिकांच्या वतीने नगरसेवक दीपक ओसवाल यांनी वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्याकडे केली आहे.
वाई शहरातील धर्मपुरी परिसरात सोन्या चांदीच्या मुख्य बाजारपेठेबरोबर कापड, दूध डेअरी, हॉस्पिटल, होलसेल मेडिकल मेडिसिन, बँका, भांडी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, स्टेशनरी, किराणा व अन्य प्रकारची होलसेल विक्री करणारी दुकाने मोठ्या प्रमाणात असल्याने आर्थिक उलाढालीचे केंद्रबिंदू मानले जाते. परंतु कोरोनोच्या लॉकडाउनमुळे गेले तीन महिने धर्मपुरीची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने व्यापार्यांचे पर्यायाने ग्राहकांचे नुकसान होत होवू लागले आहे. वाई नगरपालिका प्रशासनाने लॉकडाउनच्या काळात अनेक वेळा नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून महत्त्वपूर्ण व योग्य निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाची संवेदनशीलता कायम वाईकर नागरिकांनी अनुभवललेली आहे.
सध्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काही नियम व अटीवर बाजारातील व्यवहारात शिथिलता दिल्याने धर्मपुरी बाजारपेठ परिसर प्रतिबंधित क्षेत्र सदर बधित क्षेत्रापुरते मर्यादित करून कमी करावे व योग्य न्याय द्यावा. याबाबत आ.मकरंद पाटील यांच्याशी सर्व व्यापारी वर्गाने चर्चा केली असल्याने निर्णय घेण्यात येऊन धर्मपुरी बाजारपेठ लवकरात लवकर खुली करण्याचा आग्रह व्यापारी व नागरिकांमधून केला जात आहे.