
स्थैर्य, अलगुडेवाडी, दि. ३१ ऑगस्ट : “चांगले वाचकच भविष्यात चांगले ‘लीडर’ बनू शकतात, त्यामुळे वाचाळवीर होण्याऐवजी वाचनवीर व्हा,” असे प्रतिपादन माणदेशी साहित्यिक तथा समुपदेशक श्री. ताराचंद्र आवळे यांनी केले. पाच पांडव सेवा संघ संचलित, पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, अलगुडेवाडी येथे भटके विमुक्त दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. आवळे म्हणाले की, “शिक्षणामुळे भटक्या विमुक्त जाती-जमातीतील लोकांचे जीवनमान उंचावले आहे, मात्र अजूनही अनेकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून आणि त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवून आपण त्यांना स्वावलंबनातून स्वाभिमानाकडे नेऊ शकतो.”
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच, शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक श्री. संतोष नाळे, मुख्याध्यापक श्री. विजय शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. आर. ए. माळी आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रवीण साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रवीण साळुंखे यांनी, सूत्रसंचालन श्री. विजय शिंदे यांनी केले, तर आभार श्री. मधुकर देवकाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विनोद शिंदे, श्री. माऊली वाघमोरे, श्री. राजेंद्र सोनवलकर यांच्यासह आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.