दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । मुंबई । राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एका नाण्याच्या २ बाजू आहेत. आम्ही जो उठाव केला तो स्वाभिमानासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी केला. जे राऊत बोलतात, तेच उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे बोलतात. अजित पवारांचे प्रॅक्टिकल बोलणे असते. ज्याला जिकडे जायचे तिकडे जाऊद्या असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी आहे अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, युवराजांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंना २ विधान परिषदेची आमदारकी द्यावी लागली. एक सचिन अहिर, दुसरी सुनील शिंदे यांना दिली. एका आमदाराला निवडून आणण्यासाठी २ आमदारकी द्यावी लागली ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. केवळ युवराजांच्या प्रेमापोटी आहे. त्यामुळे आता कोण मोठा हे त्यांच्यात लागले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेबाबत विधिमंडळ सचिवालय निर्णय घेईल. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माजी राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नाही. नवीन राज्यपाल राज्यात आलेत. त्यामुळे केवळ स्टंटबाजी करणे ही नेहमीची पद्धत आहे. नेत्यांपर्यंत आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याचा अंबादास दानवेंचा केविळवाणा प्रयत्न आहे असा टोला शंभुराज देसाई यांनी लगावला.
दरम्यान, सर्व्हे वेगवेगळ्या संस्थांचे येतात. प्रत्येकाची पद्धत, कॅलक्युलेशन वेगळे असतात. मागच्या जाहिरातीच्या वादावर पडदा पडला आहे. शिवसेना-भाजपा निवडणुकीत २०० हून अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२४ चा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातला निर्णय एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस घेतील. त्यानंतर दिल्लीतील निर्णयानंतर पुढील गोष्टी होतील. परंतु २०२४ च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार-खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न आमचा आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.