
दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२५ | फलटण |
लालपरी जगली तरच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता सुखासमाधानाने प्रवास करेल. छत्रपती शिवाजी महाराजांना यांना रयतेचे सुख अभिप्रेत होते. ‘रयत सुखी तरच धर्म सुखी’ हे जाणून शिवाजी महाराजांनी अलौकिक कार्य करून इतिहास घडवला. सुरक्षित प्रवासासाठी लालपरीचा वापर करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, फलटण आगाराच्या वतीने ३९५ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कोकरे बोलत होते. सर्व एस. टी. कर्मचारी, व्यवस्थापक, प्रवाशी, वाहतूक संघटना यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून लालपरीला ओळखले जाते. लालपरीने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन गडकोट, किल्ल्यांचे दर्शन घडवले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून प्रत्येकाला सेवेची संधी दिली. त्याप्रमाणे लालपरी एस. टी. कर्मचारी यांनी प्रवासातून सर्वांना शिवविचार देऊन क्रांती घडवली.