अवघे पाऊणशे वयमान – अनुराधा जोग, मुंबई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ३० : कोरोना काळात घरात बसून राहायचे, बाहेर पडायचे नाही म्हणून घरातली इतर कामे आटोपल्यावर उरलेला वेळ कारणी लावत माझ्या दोघी बहिणी, 85 वर्षांची वृंदा निजसुरे आणि 82 वर्षांची हेमा नाडकर्णी यांनी नुकतेच छोट्या बाळांसाठीचे अनुक्रमे ३८ स्वेटर विणले आणि २५ बेबी फ्रॉक्स शिवले. या दोघींना सतत काही न काहीतरी जुन्यातून नवे करण्याचा छंद आहे. हे स्वेटर आणि फ्रॉकदेखील, उरलेल्या लोकरीतून आणि जुन्या कपड्यांतून शिवले आहेत.

एकदा आक्का (वृंदा) आणि हेमा गप्पा मारीत बसल्या असताना, हेमाने गंमत म्हणून तयार केलेलं जुन्या ओढणीपासूनचे एक ‘कोस्टर’ अक्काला दाखवले. त्यानंतर त्या दोघीनी जुन्या ओढण्या-कपडे, यातून कोस्टरच नव्हे तर पायपुसणी, वॉल हँगिंग, पर्सेस, बटवे, असे अनेक प्रकार बनवण्यास सुरवात केली. थोड्याच दिवसात हेमाचीच ८४ वर्षांची जाऊ, गीता नाडकर्णीदेखील या उपक्रमात सहभागी झाली. गीतादेखील लहान मुलांचे फ्रॉक, झबली इत्यादी शिवते. 

अशा अनेक वस्तू तयार झाल्यावर त्याचे एक प्रदर्शन भरवावे असे आम्हाला सगळ्यांनाच वाटले आणि माझ्याच मुलीच्या घरात आम्ही ते भरवले. आणि त्या दोघीनाच नाही तर आम्हा सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला कारण यातून जवळ जवळ ५०,०००/- रुपये मिळाले! त्या दोघीनींही मग ते पैसे, आमचीच चौथी बहीण (शैला गाडगीळ) जी संगमनेरला बालिका आश्रम चालवते, त्या संस्थेला देणगी म्हणून दिले.

या अनुभवानंतर त्या दोघीनी अनेकदा अशी छोटी छोटी प्रदर्शने भरवून, कधी आनंदवन तर कधी इगतपुरीच्या मूकबधिर मुलांची संस्था, अशांना देणग्या दिल्या. हे सर्व जेव्हा सुरु केले तेव्हा त्या दोघीनींही वयाची सत्तरी पार केली होती. नोकरी आणि संसारातून मुक्त झाल्यावर विशेषतः एकटेपणा आल्यापासून रिकाम्या वेळात काय करावे हा प्रश्न होताच. वयानुरूप प्रदर्शन भरवणे शक्य नव्हते, पण शिवणकाम, विणकाम हे छंद होतेच. मग त्यांनी एक नवा उपक्रम सुरु केला, छोट्या बाळांकरता झबली, टोपडी, स्वेटर, दुपटी बनवायची आणि कांजूरमार्गच्या वात्सल्य ट्रस्टला नेऊन द्यायची.

इथं एका गोष्टीचा खुलासा करणं मला आवश्यक वाटतं. माझ्यासकट आम्ही सर्व बहिणी संसारातून मुक्त झालो आहोत. आम्हाला भाऊ नाही पण आम्ही बहिणी बहिणी खूप गोष्टी एकत्र करतो. यात आमच्या कुटुंबातील तरुणाईकडूनदेखील आम्हाला प्रोत्साहन मिळते. २०१६ साली मीही एकटी झाले. त्यानंतर आम्ही मुंबईतील तिघी बहिणी माझ्याच घरात एकत्र राहतो. मधून मधून कारणपरत्वे मुलांच्या/ मुलींच्या घरी जातो. पण एरवी आमचे कार्यक्रम आम्ही स्वतंत्रपणे ठरवतो. हे असं समवयस्कांनी एकत्र राहणे खूप दृष्टीने उपयुक्त असते. त्यात आम्हीतर एकाच मुशीतून घडलेल्या आहोत. या घडीपर्यंत तरी प्रकृतीने बऱ्याच बऱ्या आहोत आणि या छंदांमुळे त्यांचे आणि त्यांची देखभाल करण्यात माझेही स्वतःच्या बारीकसारीक शारीरिक तक्रारींकडे आपोआपच दुर्लक्ष होत.

तर कोरोना काळात विणलेले हे स्वेटर आणि फ्रॉकदेखील वात्सल्यलाच द्यायचे आहेत, फक्त लॉकडाऊन कधी संपतोय याची वाट पाहणे सुरु आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!