स्थैर्य, भोसरी, दि. 19 : पिंपरी-चिंचवडच्या दापोडीत तिघांनी आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृत्यू झालेल्या मित्राने तीन दिवसांपूर्वी तीन आरोपींपैकी अनिकेतला शिवीगाळ केल्याचे आरोपींचे म्हणने आहे. याचाच राग मनात धरून गुरुवारी दापोडीच्या हॅरीश पुलाखाली अनिकेतने इतर मित्रांच्या मदतीने अजयचा खून केला. विशेष म्हणजे मृत अजय व आरोपी हे अत्यंत जवळचे मित्र होते.
अजय शशिकांत सुर्यवंशी (वय- २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनिकेत गायकवाड, मिलिंद आल्हाट, आशु कोल्हे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून अनिकेत हा या सर्वांचा मित्र होता. नितीन सयाजी शिंदे (वय- ३८) यांनी या घटनेप्रकरणी रात्री उशिरा भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी परिसरात गेल्या दोन दिवसांत दोन खून झाले असून, आरोपी गजाआड करण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी देखील रात्री उशिरा खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत अजय आणि आरोपी अनिकेत गायकवाड हे मित्र होते. अजयचा तीन-चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. तेव्हा, कोर्टात प्रेम विवाहला साक्षीदार म्हणून सर्वात पुढे आरोपी अनिकेतच होता. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. परंतु, तीन दिवसांपूर्वी मृत अजय सुर्यवंशीने अनिकेतला शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून तो गप्पा बसला. गुरुवारी दुपारी अनिकेत हा मित्रांसह दारू प्यायला बसला. दारू पिऊन झाल्यानंतर अनिकेतने अजयला फोन करून हॅरीश पुलाखाली बोलावून घेतले. त्याच्याकडून दोनशे रुपये घेऊन दारू आणली आणि अनिकेत पुन्हा दारू प्यायला. मात्र, अजयने अनिकेतकडे वेगळ्या नजरेने पाहिले. वाद करण्यास एवढं कारण पुरेस झालं आणि अनिकेतने मित्रांच्या मदतीने दगडाने ठेचून अजयचा खून केला.
एवढंच नाहीतर पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह मित्रांच्या मदतीने मुळा नदीच्या दिशेने नेला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि अवघ्या काही तासांत भोसरी पोलिसांनी आरोपी मित्रासह तिघांना अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, कर्मचारी सुमित देवकर, आशिष गोपी, गणेश हिंगे, समीर रासकर, अजय डगळे, संतोष महाडिक यांनी केली आहे.