कोरोना महामारीच नव्हे, तर अन्य नैसर्गिक वा मानव निर्मित आपत्ती निर्माण होण्यामागे आध्यात्मिक दृष्टीकोनातून अधर्माचरण (धर्मग्लानी) कारणीभूत असते. पृथ्वीवर रज-तमाचे प्रमाण वाढले की आध्यात्मिक प्रदूषण वाढते. त्याचा दृष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागतो. अशा वेळी बर्याचदा सुक्यासह ओलेही जळते. ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही’, असे भगवंताने गीतेत सांगून ठेवलेले आहे; म्हणून आपण साधना करून ईश्वराचे भक्त झालो पाहिजे. प्रत्येकाने साधना आणि धर्माचरण केले, तर आपण वैश्विक संकटांचा सामना करू शकतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘कोरोना वैश्विक महामारी : मनाला स्थिर कसे करावे ?’ या ऑनलाईन विशेष परिसंवादात ते बोलत होते. हा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून 12,956 लोकांनी पाहिला.
सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले, ‘‘आज कोरोना काळात रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. रुग्णालयात खाटा, इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळत नाही. सर्वत्र विदारक स्थिती आहे. याविषयी वृत्तवाहिन्यांवर सतत दाखवल्या जाणार्या बातम्यांमुळे समाजामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश लोक तणावाखाली आहेत. अशा वेळी जर आपण साधना केली, तर आपल्यातील आत्मबळ वाढून आपण स्थिर राहू शकतो. यासाठी प्रत्येकाने साधनेला आजच प्रारंभ केला पाहिजे.’’
हरियाणा येथील वैद्य भूपेश शर्मा यांनी सांगितले की, हजारो वर्षे आधी महर्षी चरक यांनी आयुर्वेदात लिहून ठेवले आहे की, अपेक्षा करण्यामुळे दु:ख होते अन् दु:खामुळे रोग होतात. विदेशात चर्मरोगावरील अभ्यासात असे लक्षात आले आहे की मानसिक त्रासामुळे रोग बरे होण्यास अधिक कालवधी लागतो. त्यामुळे प्रत्येक रोगावर शारीरिक उपाचारासह मानसिक आणि आध्यात्मिक उपचार केले पाहिजेत. यासाठी प्रत्येकाने पाश्चात्त्य जीवनपद्धती सोडून भारतीय जीवनपद्धतीकडे वळायला हवे. प्रतिदिन योगासने, प्राणायाम, व्यायाम यांसह योग्य आहार, निद्रा, विहार केल्यास आपल्याला त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर चांगला लाभ होतो.
या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले की, जपानमध्ये कोरोना काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. भारतातही तशीच स्थिती आहे. सतत वाढणारा तणाव हे त्याचे कारण आहे. त्यामुळे शारीरिक उपचार करतांना प्रत्येकाचे मनोबल वाढवले पाहिजे. यासाठी अनेक वर्षे संशोधन करून सनातन संस्थेचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अभिनव उपचारपद्धती शोधून काढली आहे. मनाला सकारात्मक ऊर्जा देणार्या स्वयंसूचनेच्या उपचारपद्धतीनमुळे हजारोजण तणावातून बाहेर आलेले आहेत. या स्वयंसूचना प्रत्येक कुटुंबाने आपल्या दिनचर्येत घेतल्यास संपूर्ण समाजाला त्याचा लाभ होऊ शकतो.
– रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 9987966666)