दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑकटोबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागातर्फे ७ नोव्हेंबर २२ पासून जपानी भाषा शिक्षण कोर्स सुरू होत आहे.त्यासाठी १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रेवेश सुरु करण्यात येत आहेत .स्टेप अप करिअर अकादमी यांच्या बौद्धिक सहयोगाने प्रथम जे.एल.पी. टी.लेव्हल पाचच्या परीक्षासाठी हा कोर्स सुरू होत असून नोव्हेंबर ते एप्रिल २०२३ असा सहा महिन्यांचा कोर्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी दिली. इयता ५ वी पास झालेल्या कोणालाही हा कोर्स करता येईल. वयाचे बंधन नाही. भाषा आलीच पाहिजे या प्रेरणेने सराव करणे व जाणीवेने शिकणे आवश्यक असून चांगल्या निकालासाठी ९५ टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
भारतात मराठी विषयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला खाजगीकरणामुळे नोकरीच्या अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी आपल्या देशातील संधींचा फायदा घेता घेता जपानमधील भाषा आत्मसात केली तर भारत, जपान, व जगात या जपानी भाषेमुळे अनेक नोकऱ्या मिळतील.मराठी माणूस बहुभाषिक होऊन विविध नोकरी व व्यवसाय करीत गेला तर त्याची प्रगती होईल यासाठी आवर्जून असे कोर्स पुढे सुरु करण्याचे धोरण विभागाने ठरवले आहे .प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाने सदरचा कोर्स सायंकाळी ६.३० ते ८ वेळेत ऑनलाईन होत आहे. जुलै महिन्यात परीक्षेला विद्यार्थी बसतील अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे ,अधिकच्या सविस्तर माहितीसाठी ९८९०७२६४४० या मोबाईल वर संपर्क करावा असे आवाहन मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ.सुभाष वाघमारे यानी दिली.