साताऱ्यात कांद्याचा तरवा तेजीत; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा


स्थैर्य, सातारा, दि.६ : मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे.
परिणामी, कांदा रोप अर्थात तरव्याची मागणी वाढल्यामुळे दर तेजीत आले आहेत. पूर्वी वाफ्यावर होणारी तरवा विक्री आता फुटावर केली जात आहे.

रब्बी हंगामात जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्‍याचा अपवाद वगळता सर्वत्र कांद्याची लागवड केली जाते. रब्बीत माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्‍यांतील होणारी लागवड आता पश्‍चिमेकडील सातारा, कऱ्हाड, वाई, जावळी, पाटण तालुक्‍यांमध्येही वाढू लागलेली आहे. पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत तर उसात आंतरपीक म्हणून लागवड करण्याचा कल वाढला आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याचे दर शेतकऱ्यांना दिलासा देणारे मिळाले आहेत.

त्यामुळे कांद्याच्या रोपांपासून बियाण्यांची मागणी वाढली आहे. साधारणपणे तीन ते चार हजार रुपये किलो कांदा बियाण्याचे दर गेले आहेत. सध्या रोपांची लागण वेगाने सुरू झाली आहे. पूर्वी वाफ्यावर कांद्याची रोपाची विक्री केली जात होती. मात्र, आता कांद्याचे दर तेजीत असल्याने रोपांची विक्री फुटावर केली जात आहे. यामुळे एक एकर क्षेत्रासाठी रोपांना कमीत कमी 18 ते 20 हजार रुपये खर्च येत आहे. यामुळे भांडवली खर्चात दुप्पटीपेक्षा जास्त खर्च येत आहे. जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांपासून कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत गेली आहे. नऊ ते दहा हजार क्षेत्रावर होणारी कांदा लागवड या हंगामात सुमारे 12 ते 13 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निर्यातबंदी हटवल्याने दरात सुधारणा 
कांद्याचे दर समाधानकारक राहतील, या आशेवर कांदा लागवड केली जात आहे. सध्या मिळत असलेल्या दराच्या हिशोबावर रोपांचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वाढला आहे. केंद्र सरकारने कांदा पिकावरील निर्यातबंदी उठवल्याने कांदा दरात सुधारणा होऊ लागली आहे. दरातील तेजी ग्राह्य धरून शेतकऱ्यांनीही कांदा लागवडीवरील खर्च वाढवला आहे.


Back to top button
Don`t copy text!