मेंढरे शेतात गेली म्हणून एकास काठी व दगडाने मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२३ | फलटण |
धूळदेव (ता. फलटण) गावच्या हद्दीत मेंढरे शेतात गेली म्हणून एकास दगड व काठीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एका महिलेसह पाचजणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद मेंढपाळ धुळदेव रामा नरूटे यांनी पोलिसात दिली आहे.

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. ३१ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे काका लक्ष्मण विराट ठोंबरे, चुलते सोमा साधू नरूटे, मावस भाऊ सुखदेव लक्ष्मण ठोंबरे, भाऊ साळा रामा नरूटे, दत्तात्रय रामा नरूटे, चुलत भाऊ गणेश महादेव नरूटे (सर्व रा. मुंडाळे, ता. बारामती, जि. पुणे) हे सर्वजण धूळदेव (ता. फलटण) गावच्या हद्दीत असणार्‍या कॅनॉलवर मेंढ्यांना पाणी पाजून पुणे-पंढरपूर जाणार्‍या बायपास रोडवरून त्यांच्या पालाकडे जात असताना कॅनॉलपासून २०० मीटर अंतरावर रस्त्यावरून खाली मोकळ्या शेतात त्यांच्या मेंढ्या गेल्या, म्हणून तिथे असणारे एक पुरूष व एक महिला या दोघांनी आमच्या मेंढरांना दगड मारले. त्यावेळी फिर्यादीचे काका लक्ष्मण ठोंबरे म्हणाले की, तुमची काय भरपाई असेल ती घ्या, पण आमच्या मेंढरांना मारू नका, असे म्हणाल्याच्या कारणावरून त्यांनी फोन करून तिघांना बोलावून घेतले. त्यावेळी मोटारसायकल (क्र.एमएच-११-सीएक्स-३४८१) वरून तिघे इसम तेथे आले व त्या सर्वांनी आम्हाला काठीने व दगडाने मारहाण करून मुक्का मार दिला व फिर्यादीचे काका यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार शेंडगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!