दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । घरफोडी, चोरी प्रकरणी एका संशयित इसमाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभिषेक गणेश आवारे वय ३०, रा. गेंडामळ सातारा असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील घरफोडी, चोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली की, पाच दिवसांपूर्वी सातारा येथील गेंडामाळ परिसरात असणाऱ्या पटणी रोडवेज सर्व्हिसेस गोडाऊनमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील संशयित अभिषेक आवारे हा त्याची आजी कमल आवारे रा. सातारा हिच्या घरी लपून बसला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या आजीच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने चोरींच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार आदींनी सहभाग घेतला.