स्थैर्य, दौलतनगर दि. 26 : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करीत पाटण तालुक्यामध्ये “एक गाव एक गणपती” बसवून गणेशोत्सव काळातील खर्चाला फाटा देत गणेशोत्सवाचा खर्च कोरोना संकटाचा सामना करण्याकरीता करावा असा एकमुखाने निर्णय आज पाटण याठिकाणी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. या सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाटण मतदारसंघाचे आमदार, राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई उपस्थित होते.
कोरोना मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा राज्यातील ग्रामीण भागात “एक गाव एक गणपती” बसवून राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने साजरा करावा असे आवाहन राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी केले आहे. त्याची सुरुवात त्यांचे पाटण मतदारसंघातून होण्याकरीता त्यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आप-आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करताना राज्याचे गृहराज्यमंत्री व पाटण मतदारसंघाचे आमदार ना.शंभूराज देसाई यांनी मांडलेली संकल्पना उत्कृष्ट असून कोरोना संकटकाळात गणेशोत्सवाच्या सणामध्ये राज्यातील तसेच पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. याकरीता “एक गाव एक गणपती” हि संकल्पना सर्व गावांनी राबवावी असे आवाहन आम्ही सर्वजण करीत आहोत यासंदर्भात जनजागृती करण्याकरीता आम्ही सर्वजण तयार आहोत. कोरोना काळात राज्याच्या विविध भागांत जाऊन गृहराज्यमंत्री हे तेथील प्रशासनाला सतर्क करीत राज्यातील विविध भागातील जनतेची मंत्री म्हणून ते काळजी घेत आहेत.तसेच पाटण मतदारसंघातील जनतेवरही त्यांचे विशेष लक्ष असल्याने गत चार महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाटण मतदारसंघात रोखण्याकरीता त्यांचे कसोशिने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येणारा गणेशोत्सव हा पाटण तालुक्यात “एक गाव एक गणपतीने” साजरा व्हावा याला आमचा सर्वांचा पाठींबा तसेच सहमती असून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये यासंदर्भात प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्वजण जागृती करु अशा प्रतिक्रिया सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्याकरीता जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय आपण सर्वजण करीत आहोत. गेली चार महिने आपण या संकटाचा सर्वजणच सामना करीत आहोत. होऊ घातलेला सार्वजनिक गणेशोत्सव कशा पध्दतीने साजरा करायचा याच्या मार्गदर्शक सुचना राज्यशासनाने यापुर्वीच प्रसिध्द केल्या आहेत. गर्दीत जाणे टाळणे हा एकमेव कोरोना रोखण्याचा उपाय असल्याने यंदाचा गणेशोत्सव हा विना गर्दीचा होण्या करीता “एक गाव एक गणपती” हि संकल्पना राबविणेचे आवाहन मी गृहराज्यमंत्री या नात्याने राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला केले आहे. त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघातून करावी अशी विनंती मी सर्वपक्षीयांचे संमतीने व सहकार्याने पाटण मतदारसंघातील जनतेला करीत आहे. “एक गाव एक गणपती” यामुळे आपले स्व:ताचे व कुटुंबियांचे कोरोना साथीचे रोगापासून रक्षण होईल असा मला विश्वास आहे. असे यावेळी ते बोलताना म्हणाले.
याप्रसंगी बैठकीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हिंदुराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे फत्तेसिंह पाटणकर, शिवसेना पक्षाचे जयवंतराव शेलार, महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचे गोरख नारकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया पक्षाचे प्राणलाल माने, बहुजन समाजवादी पक्षाचे शिवाजी कांबळे, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, उंब्रज सपोनि अजय गोरड, ढेबेवाडी सपोनि उत्तम भजनावळे, कोयना सपोनि एम.एस. भावीकट्टी, मल्हारपेठ पीएसआय अजित पाटील, पोलीस संघटनेचे सुभाष कदम, तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. सी. के.यादव, डॉ. रघुनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेशोत्वाच्या खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपावी
सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोना संसर्गाचे काळात “एक गाव एक गणपती” मुळे गणेशोत्वाच्या खर्चाला फाटा देत कोरोनाचा सामना करण्याकरीता कोरोना बाधित गावांमध्ये मास्क, सॅनिटायझर, रोग प्रतिबंधक गोळया, गोर-गरीब कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूचे वाटप तसेच आरोग्य विषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील गणेश मंडळांना केले आहे.