दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । फलटण । साहित्य हे माणसाला चांगले जीवन जगण्याची दिशा देणारे महत्त्वाचे साधन आहे. जुन्या नव्या विचारांचा मेळ घालून आनंदी जीवन जगता आले पाहिजे, हे ज्याला जमते ती व्यक्ती यशस्वी जीवन जगून इतरांना प्रेरणा देते. जीवनात काव्याला फार महत्व आहे, कमी शब्दात जास्त आशय देणारा हा साहित्य प्रकार आहे. काव्य जगण्याला ऊर्जा देते असे साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी नाना नानी पार्क येथे वन विभाग सातारा परिक्षेत्र फलटण, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण व अर्थ फाऊंडेशन फलटण यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जागर वसुंधरेचा नववर्षारंभ निसर्ग काव्य मैफलीत मत व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. सुधीर इंगळे, नियत क्षेत्र वन अधिकारी नितीन बोडके, गोपाळ सरक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, नववर्षारंभ निसर्ग काव्य मैफलीत वसुंधरेचा जागर झाला असून, निसर्ग जपण्यासाठी निसर्ग संवर्धन कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे तसेच त्यांनी वृक्षांची दशा, तुम्हीच सांगा या कविता सादर केल्या.
यावेळी वनअधिकारी राहुल निकम, युवा कवी अविनाश चव्हाण, प्रा. डॉ. अशोक शिंदे, आकाश आढाव, शाहीर प्रमोद जगताप, सौ. प्रतीक्षा आढाव यांनी निसर्ग, पाणी, सजीव व पर्यावरण वाचवा याच्याशी निगडीत विविध ढंगातील कविता सादर करून सर्वांना खळखळून हसवले व वसुंधरा वाचवा हा मोलाचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन जाधव, अभिजित नाळे, दत्तात्रय खरात यांनी परिश्रम घेतले. यावेळी काव्य रसिक, वन खात्याचे अधिकारी कर्मचारी, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.