फलटण येथे एकास मारहाण करत लुटले; अक्षय गायकवाडसह चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील कोळकी हद्दीतील फलटण-दहिवडी रस्त्यावर कोकरे हॉस्पिटलच्या बोर्डजवळ थांबलेल्या तुषार संपत कुराडे (वय ३१, मूळ रा. आसू जाधववाडी (तामखडा), ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. नंदिनी टकलेनगर, मांजरी बुद्रुक, पुणे) यास कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य अक्षय गायकवाड यांच्यासह चौघाजणांनी ‘तू चुकीच्या माणसाला नडला आहेस’ असे म्हणत मारहाण करत लुटल्याची घटना १४ डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तुषार कुराडे याने लुटमार करणार्‍या चौघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या लुटमारीत तुषार कुराडे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची चेन (अंदाजे किंमत १ लाख) हिसकावल्याचे कुराडे यांनी तक्रारीत म्हटले असून या प्रकरणी अक्षय गायकवाड व त्याचा भाऊ (दोघेही रा. फलटण शहर) व इतर दोन अनोळखी इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तुषार कुराडे हे स्वत:च्या गाडीतून १४ डिसेंबर रोजी दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास कोळकी हद्दीतील फलटण-दहिवडी रस्त्यालगत कोकरे हॉस्पिटलच्या बोर्डजवळ आले असताना एका इसमाने ‘टू व्हिलर’ आडवी मारून त्यांची गाडी थांबविली व त्यावेळेस पाठीमागून आलेल्या तिघाजणांनी कुराडे यांच्या मानेला धरून त्यांना गाडीतून बाहेर ओढले. त्यावेळी एका इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतली. तसेच सर्वांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत बाचाबाची केली. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी पाठीत, डोक्यात, मारहाण करून ‘तू खूप चुकीच्या माणसाला नडला आहेस’ अशी धमकी दिली, असे तुषार कुराडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या लुटमारप्रकरणी पोलिसांनी अक्षय गायकवाड, त्याचा भाऊ व इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा करत आहेत.

या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले अक्षय गायकवाड हे राजे गटाचे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. यासोबतच कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राजे गटाने तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी करत त्यांनी निवडणूक लढवली होती. यासोबतच श्रीमंत रामराजे यांचे निकटवर्तीय असल्याचे अक्षय गायकवाड हे सांगत असतात.


Back to top button
Don`t copy text!