
स्थैर्य, सातारा, दि. १४: पुणे बेंगलोर महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय.23) असे मृत बहिणीचे तर किरण काशीनाथ मसुगडे (वय 21, दोघी रा. अपशिंगे (मि.) ता. सातारा) असे गंभीर जखमी असलेल्या दुसर्या बहिणीचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी सातारा येथून एक टाटा 207 टोव्हिंग क्रेन भरधाव वेगाने कोल्हापूरकडे निघाला होता. ही टोव्हिंग क्रेन भरतगाववाडी गावच्या हद्दीत आली असता तिने पुढे चाललेल्या ज्युपिटर दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील दोघी बहिणी अक्षरश चेंडूसारख्या हवेत उडाल्या तर त्यांची दुचाकीही अनेक पलट्या खाऊन महामार्गावरून खाली खड्डयात जाऊन पडली. टोव्हिंग क्रेनने महामार्गालगतचे चार ते पाच संरक्षक दगडही उखडून टाकले. या अपघातात दुचाकीवरील तेजस्विनी काशिनाथ मसुगडे व किरण काशिनाथ मसुगडे या सख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या होत्या. ग्रामस्थ व महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलावून दोघींनाही उपचारासाठी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र, उपचारापूर्वी तेजस्विनी मसुगडे हिचा मृत्यू झाला. किरण मसुगडे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, चालक धनंजय जाधव यांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने व टोव्हिंग क्रेनचालक इरफान मुबारक मुजावर (रा.कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.