दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी (माण) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत लाला जाधव (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश बबन कट्टे (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झालाय.
शिरवळ येथील एम आय डी सी मध्ये कामाला असलेले सूर्यकांत जाधव व महेश कट्टे हे दुचाकी वरून निघाले होते. पांगरी जवळ आल्यानंतर बिरोबा मंदिरा नजिक ओढयावरील पुलावर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात त्याच्या दुचाकीची फलटणहून येत असलेल्या ट्रकला जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी पुलाच्या दुसऱ्या बाजूला शंभर फुटापर्यंत ट्रकने फरपटत गेली. यामध्ये जबर मार लागल्यामुळे सूर्यकांत याचा जागीच मृत्यू झाला. तर महेश गंभीर जखमी झाला होता. जखमीना तसेच सोडून ट्रकचा ड्रायव्हर पळून गेला होता. घटनास्थळी रक्ताचा सडा पसरला होता. घटनेची माहिती समजताच दहिवडीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे आणण्यात आले. त्यामध्ये जाधव याला मृत घोषित केले तर कट्टे याला अधिक उपचारासाठी सातारला पाठविण्यात आले. तपास सपोनि संतोष तासगावकर याच्यां मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिस करीत आहेत.
शांत व मनमिळावू स्वभाव असलेल्या सूर्यकांत जाधव याचा गेल्या दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.