
स्थैर्य, कोरेगाव, दि.३: शहरातील जुन्या दौलत टॉकीजसमोरील मोकळ्या जागेत शनिवारी दुपारी झालेल्या खुनी हल्ल्यामध्ये एकाचा खून तर एक जण अत्यंत गंभीर जखमी झाला आहे. सुनील नंदकुमार घोरपडे वय ४८, असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, आनंदा बाळू जाधव हा गंभीररित्या जखमी झाला आहे. दोघेही एकंबे गावानजिक वसलेल्या सायगाव (पुनर्वसीत) या गावातील आहेत. जखमी असलेल्या आनंदा जाधव याच्यावर सातारच्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत, मात्र त्याची प्रकृत्ती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळावरुन आणि पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सातारा-पंढरपूर रस्त्यावर जुन्या बसस्टँडनजिक दौलत चित्रमंदिर या नावाने जुने टॉकीज आहे. अनेक वर्षांपासून हे टॉकीज बंद पडले आहे. त्यामुळे या परिसरात सध्या नागरिकांचा वावर नसतो. टॉकीजसमोर एक मोठे व्यापारी संकुल आहे. शनिवारी दुपारी सायगाव (एकंबे) येथील सुनील नंदकुमार घोरपडे, आनंदा बाळू जाधव व त्यांची मित्रमंडळी टॉकीजसमोर मोकळ्या जागेत त्यांच्यामध्ये बोलणे चालू होते, अचानक हाणामारीला सुरुवात झाली. तेथे पडलेली लाकडे हातात घेऊन एकमेकास बडविण्यास सुरुवात झाली, डोक्याला गंभीर इजा झाल्याने सुनील नंदकुमार घोरपडे याचा जागीच मृत्यु झाला तर आनंदा बाळू जाधव हा गंभीररित्या जखमी झाला.
कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गंभीररित्या जखमी अवस्थेतील आनंदा बाळू जाधव याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याची प्रकृत्ती चिंताजनक झाल्याने तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचे गार्ंभीय लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल व ऋतुजा खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले असून, त्यांनी स्वतंत्ररित्या तपासाला सुरुवात केली आहे. त्यांनी काही जणांची धरपकड केली आहे.
याप्रकरणी मृत सुनील याचा भाऊ गणेश नंदकुमार घोरपडे याने अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली असून, त्याअनुषंगाने कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा एक तर खुनी हल्ल्याचा एक असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार सुनील नंदकुमार घोरपडे व आनंदा बाळू जाधव हे दोघेही सायगाव (एकंबे) येथील रहिवासी आहेत. सुनील हा अनेक वर्षांपासून ुमुंबईत डंपरवर चालक म्हणून काम करत होता, मुंबईतच एका मुलीबरोबर त्याने आंतरजातीय विवाह केला, त्याला मूलबाळ नव्हते. त्याने गावी परतण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र पत्नीने त्यास नकार दिला होता, त्यामुळे त्याने पत्नीला मुंबईत सोडून दिले. काही वर्षांपूर्वी सायगाव येथे आपला मुक्काम हलविला होता. तो आई-वडीलांसमवेत गावी शेती करत होता. आनंदा बाळू जाधव हा शेती करत असून, मोकळ्या वेळेत तो बांधकामावर बिगारी म्हणून गवंड्यांच्या हाताखाली काम करत आहे.