दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मिरढे (ता. फलटण) गावच्या हद्दीत बस स्टँडजवळ मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
बाळू कोंडीबा हाके (वय ६०, रा. मिरढे, ता. फलटण) असे अपघातातील मृताचे नाव आहे, तर मोटारसायकलचालक सागर रूपनवर (रा. शिंगणापूर, ता. माण, जि. सातारा) हा जखमी झाला आहे.
या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मिरढे (ता. फलटण) गावच्या हद्दीत बस स्टँडजवळ मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास फलटणहून मोटारसायकल (क्र. एमएच-११-सीवाय-०९३८) वरून येणारे बाळू कोंडीबा हाके (वय ६०, रा. मिरढे) यांना शिंगणापूरहून येणार्या बिगर नेमप्लेट मोटरसायकलस्वार सागर रूपनवर (रा. शिंगणापूर, ता. माण) याने समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक बाळू कोंडीबा हाके हे ठार झाले आहेत, तर सागर रूपनवर हा जखमी झाला आहे.
या अपघातप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवून हाके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सागर रूपनवर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक रानगट करत आहेत.