दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | दिवाळीसाठीची रोषणाई करताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा शॉक लागल्याने चिमणपूरा पेठेतील कारंडबी नाका परिसरात राहणाऱ्या सुनील तुकाराम पवार (वय ४०) यांचा काल रात्री मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत पवार यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
चिमणपूरा येथील कारंडबी नाका येथे सुनील तुकाराम पवार हे पत्नी ज्योती तसेच मुले श्रवण आणि ओम यांच्यासह राहण्यास होते. काल सायंकाळी ते दिवाळीसाठी आकाशकंदील व लाईटच्या माळा घरासमोर लावत होते. हे काम करत असतानाच सुनील पवार यांना घरासमोरुन गेलेल्या उच्चदाब वीज वाहिनीचा शॉक बसला. त्यांना शॉक बसल्याचे लक्षात आल्यानंतर ज्योती या त्यांना सोडविण्यासाठी त्याठिकाणी गेल्या, मात्र त्यांना देखील जोराचा शॉक बसला. शॉक बसल्यामुळे आईवडील थरथरत असल्याचे पाहून तिकडे श्रवण आणि ओम यांनी धाव घेतली. यावेळी त्या दोघांनाही शॉक बसला. उच्चदाब वाहिनीचा शॉक बसल्याने सुनील पवार, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले जखमी झाल्याचे समजताच त्या परिसरातील नागरीकांनी तिकडे धाव घेत त्यांची सोडवणूक केली.
यानंतर सुनील पवार यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती सुनील पवार यांना मृत घोषित करण्यात आले. याची प्राथमिक नोंद पोलिस ठाण्यात झाली असुन तपास हवालदार शिखरे हे करीत आहेत.