
दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । सातारा । पुणे-बंगळुर महामार्गावर ट्रकला पाठीमागून दुचाकीने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्या पाठीमागील गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार, दि. १ मार्च रोजी अतित, ता. सातारा गावच्या हद्दीत घडली. याबाबतची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील अतित गावच्या हद्दीत हॉटेल विश्वजीतनजिक निसराळे फाट्याच्या दिशेला असणाऱ्या दुभाजक येथे दुचाकीस्वाराने दुचाकी वेगात चालवत समोरील ट्रक क्र. केअे ३२ डी 0६८३ ला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार सुशांत यशवंत दुपटे रा. कापिल ता. कराड हे जागीच ठार तर पाठीमागे बसलेले माणिक राजाराम पाटील रा. कापिल ता. कराड हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार व्ही. आर. देसाई हे करत आहेत.