दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरातील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एकास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी तीन वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संतोष मच्छद्रिं चवरे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरातील अल्पवयीन मुलीचा संतोष मच्छिंद्र चवरे याने विनयभंग केला. याप्रकरणी चवरे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी केल्यानंतर चवरे याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या खटल्याच्या सुनावणीत पोलिसांनी सादर केलेले तसेच परिस्थितीजन्य पुरावे आणि जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून संतोष चवरे याला तीन वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
या खटल्यात प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, सहायक फौजदार अविनाश पवार, उर्मिला घारगे, हवालदार शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, गजानन फरांदे, रिहाना शेख, अजित फरांदे, वैभव पवार, राजेंद्र कुंभार, अमित भरते, अश्विनी घोरपडे, पद्मिनी जायकर यांनी सहकार्य केले.