दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२२ । दहिवडी । माण पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या एकत्रित सहभागातून जमा केलेल्या निधीतून आज दिनांक २९ मार्च रोजी कोविड-१९ मुळे अनाथ झालेल्या व जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ३९ विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली. या अनाथ मुलांच्या नावावर रुपये ११५०० चे पोस्टाचे बचत प्रमाणपत्र तयार केले असून या प्रमाणपत्राचे वितरण गटशिक्षणाधिकारी मा माणिक राऊत साहेब, विस्तार अधिकारी सोनाली विभूते, रमेश गंबरे, संगीता गायकवाड, भरतेश गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उपस्थित राहून कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तीप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच प्राथमिक शिक्षक सदैव अनाथ मुलांना शैक्षणिक मदत करतील अशी ग्वाही अनाथ मुलांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली. यावेळी केंद्रप्रमुख नारायण आवळे,अंकुश शिंदे तसेच तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.