
दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत सातारा – लोणंद रस्त्यावर हॉटेल शिवशाहीच्या पुढे लोणंद बाजूकडे असणाऱ्या कालव्याच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा पध्दतीने उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने लिंब आवळीमाथा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरत लक्ष्मण सावंत असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून अज्ञात ट्रॅक्टरचालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, संजय रामचंद्र सावंत (वय २४, रा. लिंब आवळीमाथा, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत असणाऱ्या सातारा – लोणंद रस्त्यावर हॉटेल शिवशाहीच्या पुढे लोणंद बाजूकडील कालव्याच्या रस्त्यावर एका अज्ञाताने शनिवार, दि. १८ रोजी सायंकाळी उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर (एमएच ४५ – एफ २६९८) वाहतूकीस अडथळा होईल, अशाप्रकारे रस्त्यावरच उभा केला होता. याच मार्गावरुन भरत लक्ष्मण सावंत (वय ५0, रा. लिंब, आवळीमाथा, ता. सातारा) हे दुचाकीने (एमएच ११ – सीडी ७0६0) निघाले होते. मात्र, त्यांची दुचाकी वाहतुकीस अडथळा होईल, अशाप्रकारे उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. यात भरत यांचा अपघात झाला. त्यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
याबाबतची तक्रार संजय रामचंद्र सावंत यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करत आहेत.