
स्थैर्य, बारामती, दि. १३ ऑगस्ट : घराचा उंबरा हेच जगातील सर्वात मोठे शिखर आहे आणि जो व्यक्ती ते पार करू शकतो, तो जगातील कोणतेही शिखर सहज सर करू शकतो, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर आणि जागतिक प्रवासी आनंद बनसोडे यांनी केले. बारामती ट्रेकर्स क्लबच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘फिरस्त्यांच्या मेळाव्या’त ते बोलत होते.
यावेळी आनंद बनसोडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातील सायकल पंक्चर काढणाऱ्याच्या मुलापासून ते एव्हरेस्ट शिखर सर करण्यापर्यंतचा आपला संघर्षमय प्रवास उलगडला. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण २७ देशांचा प्रवास करून सात प्रमुख पर्वतशिखरे सर केल्याचे त्यांनी सांगितले. फिरस्त्यांचा असा मेळावा भारतात प्रथमच पाहत असल्याचे सांगत त्यांनी या अनोख्या संकल्पनेचे कौतुक केले.
याप्रसंगी बारामती ट्रेकर्स क्लबच्या वतीने, इतिहासात लुप्त झालेली ‘कऱ्हा परिक्रमा’ पुन्हा सुरू करण्याचा आणि ऐतिहासिक मंदिरे व लेण्यांचा अभ्यासात्मक दौरा आयोजित करण्याचा मानस ॲड. सचिन वाघ यांनी व्यक्त केला. या अनोख्या मेळाव्याला राज्यभरातून अनेक ट्रेकर्स, साहित्यिक, इतिहासप्रेमी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.