जीएसटी घोटाळाप्रकरणी एकास अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । मुंबई । खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैद्य यांना अटक करण्यात आली असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मे.एस.एस. सर्व्हिसेससह अन्य पाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 88 कोटी रूपयांची खोटी बीजके जारी केली आहेत. त्यानुसार शासनाची सुमारे 16 कोटींची महसुली हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना शशांक वैद्य हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना न्यायालयाने दि 31 मे 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशिवाय 17 कोटी रूपयांची बनावट बीजके देऊन, 3.09 कोटी रूपयांचा वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करून 3.09 कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. तसेच करदाता मे.एस.एस. सर्व्हिसेसच्या मालक श्रीमती सायली परूळेकर या कोणताही व्यवसाय करीत नाहीत, असे तपासात लक्षात आले आहे.

या आर्थिक वर्षातील सलग दहाव्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. अन्वेषण अधिकारी श्रीमती लीनता चव्हाण या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात अटक कारवाई करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!