
दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । सातारा । शेतीपंप चोरी प्रकरणी एका संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्याकडून कृषीपंपासह यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यामध्ये सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. संशयित युवक अनिकेत दिपक वाघमारे वय १८ रा. वरुड, ता. खटाव याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये समीर कदम, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, विक्रम माने, गणेश घाडगे आदींनी सहभाग घेतला.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना तेथील स्थानिकांकडून माहिती मिळाली, सातारा शहरामधील एमआयडीसी परिसरामध्ये येथील काही युवक कृषीपंप चोरीचा विक्रीसाठी घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारावरून निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संबंधितांना ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. हे पथक एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करताना दोन युवक दुचाकीवरून संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या बारदानामध्ये कृषीपंप मिळून आल्याने याबाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्यांनी कृषीपंप वरुड, ता. खटाव येथून त्यांच्या अन्य साथीदारांमार्फत चोरी केला असल्याचे सांगितले. दोघांपैकी अनिकेत दिपक वाघमारे वय १८, रा. वरुड, ता. खटाव त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.