दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । पाटण । पाटण तालुक्यातील गावच्या हद्दीत संत निरंकारी भवन शेजारील इमारतीच्या पाठीमागील शेडमध्येे वास्तव्यास असलेल्या बॉबी विक्रेता रामण मुत्या तेवर उर्फ बॉबीवाला अण्णा (तामिळनाडू, वय 58) याचा डोक्यात लोखंडी पाट्याने प्रहार करून खून केल्या प्रकरणी पाटण पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी काल्यापन एस. कंदन (वय 40, रा. मठगणेरी, ता. रथापुरम, जि. तिरूत्तणी, तामिळनाडू) याला पोलिसांनी पाटण न्यायालयासमोर हजर केले असा शनिवार दि. 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हावशी, ता. पाटण गावच्या हद्दीत संत निरंकारी भवन शेजारील इमारतीच्या पाठीमागील शेडमध्येे बॉबी विक्रेता रामण मुत्या तेवर उर्फ बॉबीवाला आण्णा (सध्या रा. म्हावशी, ता. पाटण, वय 58) याच्या डोक्यात गाडीच्या लोखंडी पाट्याने प्रहार करून खून केल्याचे रविवार दि. 31 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आले होते. या खूनप्रकरणी पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर, पीएसआय महेश पाटील हे पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस फौजदार संतोष कोळी व नागेश भरते, पोलीस हवालदार जी. डी. साळुंखे, पोलीस नाईक डी. बी. लोंढे यांच्या समवेत तातडीने घटनास्थळी दाखल होवून शिघ्रगतीने तपासाची चक्रे हलवली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. सदर संशयित आरोपी काल्यापन हा कोल्हापूरच्या आसपास असल्याचे समजले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि उत्तम भापकर, पीएसआय महेश पाटील यांनी तात्काळ कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पीआय गोरले यांच्याशी संपर्क साधून संशयित आरोपीबाबत माहिती दिली. गोरले यांनी कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने गांधीनगर परिसरात ट्रॅप लावून मयत तेवरे याचा सहकारी गाडीचालक संशयित आरोपी काल्यापन एस. कंदन (वय 40, रा. मठगणेरी, ता. रथापुरम, जि. तिरूत्तणी, तामिळनाडू) याला शिताफिने ताब्यात घेत त्याला पाटण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
सोमवार दि. 1 रोजी संशयित आरोपी काल्यापन याला पाटण न्यायालयासमोर हजर केले असता शनिवार दि. 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यात आणखी एकाचा हात असण्याची शक्यता व्यक्त करत त्यादृष्टीने पाटण पोलिसांकडून तपास सुरू आहे. याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि उत्तम भापकर करत आहेत.