स्थैर्य, सातारा, दि. १६ : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कुपर कंपनीतून चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका कामगारास अटक केले आहे. गणेश दीपक रसाळ (रा. बोरखळ, ता. सातारा) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याबाबत माहिती अशी, संशयित रसाळ हा कूपर कंपनीत कामगार असून, त्याने 22 जून रोजी कंपनीच्या आवारातून लोखंडी प्लेटांची चोरी केली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. दि. 16 रोजी संशयित हा सदर बझार परिसरातील पुरुष भिक्षेकरी गृहासमोर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार जर्हाड यांनी रामकुंडाजवळ सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतला. त्याच्याकडून लोखंडी प्लेटांची विक्री करुन आलेले रोख 40 हजार रुपये पोलिसांनी जप्त करून पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सर्जेराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, सहा. फौजदार ज्योतीराम बर्गे, हवालदार कांतीलाल नवघणे, सुधीर बनकर, मुबीन मुलांनी,विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, विजय सावंत यांनी केली.