लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्हीकडून प्रत्येकी एक अर्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । लोणंद । लोणंद नगरपंचायतीवर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दहा जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तसेच आरक्षण सोडतीत अनुसुचित जातीसाठी नगराध्यक्ष पद राखीव झाल्याने राष्ट्रवादीकडून मधुमती गालिंदे -पलंगे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे तर तीन जागा असलेल्या काँग्रेस कडून भाजपच्या पाठिंब्यावर दिपाली निलेश शेळके यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. दुपारनंतर करण्यात आलेल्या छाननीत दोन्हीही अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

आज लोणंद नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुपारी दोन वाजताच्या मुदतीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक सात मधून निवडून आलेल्या मधुमती पलंगे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे रवींद्र क्षीरसागर तर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीच्याच नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या उमेदवार सीमा वैभव खरात यांच्या सह्या आहेत. तर काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेल्या दिपाली निलेश शेळके यांच्या अर्जावर सूचक म्हणून प्रविण व्हावळ यांची तर अनुमोदक म्हणून आसिया बागवान यांची सही आहे. दोन्हीही उमेदवारांकडून दूपारी दिड वाजण्यापुर्वीच लोणंद नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

सध्या लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस दहा, भाजप तीन, राष्ट्रीय काँग्रेस तीन व एक अपक्ष नगरसेवक असे बलाबल आहे. मात्र राष्ट्रवादी वगळता कोणाकडेच बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या मधुमती गालिंदे -पलंगे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. तर काँग्रेसला आणि भाजप एकत्रित संख्या सहा झाली असून बहुमतासाठी तीन जागा कमी पडत आहेत.  लोणंद नगरपंचायतीवर शेळके-पाटील घराण्यालाच सलग तिसऱ्यांदा नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी सद्या विविध पक्षांतील सतरापैकी सात नगरसेवक असलेल्या शेळके-पाटील घराण्यातील भावकीची समिकरणे लागू पडणार की पक्षनिष्ठा राखून बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होणार याचं उत्तर दहा तारखेलाच मिळणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ९ फेब्रुवारी पर्यंत असून १० रोजी नगराध्यक्ष निवडणूक व निवडणूक निकाल घोषित करण्यात येणार आहे , तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी दि. १० रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!