दैनिक स्थैर्य | दि. ११ मे २०२३ | फलटण |
मित्राकडून ‘रियल इस्टेट’ व्यवसायासाठी घेतलेल्या २१ लाख रुपयांच्या परतफेडीसाठी दिलेले चेक न वटल्याने दाखल खटल्यातून पुरंदर तालुयातील एकाची निर्दोष सुटका फलटण न्यायालयाकडून करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, गुणवरे, ता. फलटण येथील फिर्यादी प्रीतम प्रतापराव मोरे यांनी त्यांचे मित्र धनंजय सोपान पांगारकर (रा. केतकावळे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचे ‘ रियल इस्टेट’ व्यवसायासाठी सन २०१८ मध्ये १४ लाख आणि सन २०१९ मध्ये ७ लाख असे एकूण २१ लाख रुपये उसनवारीने दिले होते.
या उसनवारीने दिलेल्या रकमेपोटी धनंजय पांगारकर यांनी मोरे यांना स्वत:च्या खात्यातून बँक ऑफ इंडिया, शाखा स्वारगेट, पुणे आणि आयडीबीआय बँक शाखा कापूरहोळ या बँकांचे अनुक्रमे ६ लाख आणि ७ लाख रुपयांचे दोन चेक दिले होते व चेकवरील रकम मिळण्याची खात्री व हमी दिली होती.
त्यानंतर फिर्यादी मोरे यांनी ते दोन्ही चेक त्यांच्या खाते असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा गुणवरे येथे जमा केले. मात्र, ते चेक न वटता परत आल्याने फिर्यादीला चेकवरील रकम मिळाली नाही. त्यावर फिर्यादी मोरे यांनी आरोपी धनंजय पांगारकर यांच्या विरोधात फलटण येथील न्यायालयात खटला दाखल केला होता.
या खटल्याकामी चौकशीवेळी झालेले साक्षी पुरावे व आरोपीचे विधीज्ञ अॅड. जावेद एम. मेटकरी यांनी केलेला युतिवाद ग्राह्य मानून फलटण येथील न्यायाधीश सौ. यु.एम. वैद्य यांनी आरोपी धनंजय पांगारकर यांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली आहे.