दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२३ । मुंबई । बोलल्यानंतर मार्ग निघतात, कटुता राहत नाही. निवडणूक झाली की राजकीय आखाडा संपवला पाहिजे. पवार साहेब फोन करतात. माझा पक्ष वेगळा त्यांचा पक्ष वेगळा आहे, पण समाजासाठी, राज्यातील विषयांसाठी फोन करतात. मार्ग काढावा म्हणून, राज्याला फायदा व्हावा म्हणून फोनवर बोलणे होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले, तेव्हा चर्चा रंगल्या होत्या. या मराठा मंदिरच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर स्तुतिसुमने उधळली. यावेळी ते म्हणाले, संस्था अनेक निर्माण होतात, पण सातत्याने या संस्था कार्यरत राहणे, टिकवणे सोपे नसते, मराठा मंदिरने मुंबईसह, सोलापूर, सांगली, रत्नागिरी अशा विविध प्रांतात आपल्या शैक्षणिक कार्याचे जाळे उभे केले आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी शासनाकडून सहकार्य केले जाईल, होते.
शाह यांच्या बैठकीला न जाता इथे आलो
या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पवार साहेब ‘वर्षा’वर आले. मी शब्द दिला होता या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. आज दिल्लीत अमित शाह यांच्या बैठकीला न जाता मराठा मंदिर कार्यक्रमाला हजेरी लावली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती
पवार म्हणाले, मराठा मंदिर या शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थासाठी परदेश शिष्यवृत्ती सुरु करणार असून यासाठी ५० लाखाची तरतूद करण्याची जबाबदारी मी घेतो. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, संजय राणे, शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे उपस्थित होते.