
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम (आप्पा) भोसले हे एका कार्यक्रमात एकत्र आल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे हे दोन नेते एकत्र दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
साखरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार श्रीमंत रामराजे यांनी स्वतः विक्रम भोसले यांच्या विरोधात प्रचार करूनही राजे गटाच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीवेळी साखरवाडी येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत, विक्रम भोसले यांनी रामराजेंवर सडकून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, या दोन नेत्यांची अचानक झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या भेटीबाबत बोलताना, माजी सरपंच विक्रम भोसले यांनी मात्र कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले आहे. “कारखान्याच्या काही प्रलंबित कामांसाठी आम्ही कारखाना कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी श्रीमंत रामराजे हे देखील तिथे उपस्थित होते. त्यांनीच मला बोलावून फोटोसाठी उभे केले. ही केवळ एक योगायोगाने झालेली भेट होती,” असे त्यांनी सांगितले.