दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । मुंबई । आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. या ५४ आमदारांना नोटिसीवर उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला आहे. याबाबतचा निर्णय १० ऑगस्टपूर्वीच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
५४ आमदारांना नोटिसा पाठविल्या असून, न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशांचे पालन केले जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर साधारणतः तीन महिन्यांत अध्यक्षांकडून अपात्रतेसंदर्भात निर्णय घेणे आवश्यक आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार नोटिसीला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, विधानसभा उपाध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठे विधान केले आहे.
शिवसेनेचे ‘ते’ १६ आमदार अपात्र आहेत
प्रसारमाध्यमांशी नरहरी झिरवाळ यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत, पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे उचीत ठरणार नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह पहिल्यांदा जे १६ आमदार सुरतला पोहोचले, त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती.