दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । फलटण । ‘योगियां दुर्लभ तो म्या देखिला साजणी’ हा ज्ञानदेवांचा अभंग सर्वांच्याच माहितीचा व अत्यंत आवडीचा आहे. मला तर या अभंगाने अक्षरक्ष मोहनी घातली आहे. स्वरराज छोटा गंधर्व यांनी गायलेला हाच अभंग मी एकावेळी किमान पाच-सहा वेळा ऐकतो, आणि असे ऐकण्याची कृती माझ्याकडून सातत्त्याने होत असते. तरीही मनाची तृप्ती होत नाही. या अभंगातील शब्द, त्यातील भाव, ईश्वराचे विलोभनीय दर्शन.. सर्वच काही अलौकिक आहे. या प्रसंगी ज्ञानदेवांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचे आत्यंतिक कुतूहल माझ्याही मनाला सतावत राहते. ज्ञानदेवांना आलेल्या या प्रतितीनंतर ईश्वर दर्शनाचे भावभीवर वर्णन करणारे अनेक अभंग त्यांनी रचले. पण साधकांच्या पाठात व वारकऱ्यांच्या वाचनात, श्रवणात बहुदा हाच अभंग असतो. काही महात्मे, अभ्यासू साधक व थोर चिंतनकार त्या इतरही अभंगांचे मनन, चिंतन, श्रवण करीत असतील. ते सारे भाग्यवान आहेत. योग्यांनाही सहजासहजी न दिसणाऱ्या त्या विधात्याचे दर्शन झाल्यानंतर ज्ञानदेवांची जी स्थिती आहे याचा शोध घेताना मझ्या मनाला जे भावले, अल्पबुध्दिला जे जाणवले ते या लेखाव्दारे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.. ज्ञानदेवांच्याच शब्दात.! या विषयी ज्ञानदेवांचे जे अभंग आहेत त्यापैकी काही निवडक अभंगांच्या आरंभीच्या फक्त दोन ओळी येथे घेतल्या आहेत. परंतू लेखातील पूर्ण वर्णन त्याच अभंगातील ज्ञानदेवांच्याच शब्दांचा भावार्थ आहे.
योगियां दुर्लभ तो म्या देखिला साजणी
पाहतां पाहतां मना न पुरे धनी
सर्व विषयांचा त्याग करुन, किंबहूना साऱ्या विश्वाला बाजूला सारुन ईश्वर प्राप्तीसाठी गिरिकंदरांमध्ये ध्यानस्थ बसलेल्या योग्यांना ज्याची प्राप्ती सोडा, साधे दर्शनही दुर्लभ आहे तो परमेश्वर मी पाहिला. जो देवांचाही देव आहे त्याच्या दर्शनाने माझ्या मनातील व्दैतभाव निघून गेला. मी त्याला अनंत वेषांमध्ये आणि अनंत रुपांमध्ये पाहिला. पण साजणी तुला एक सांगू ! त्या दर्शनाची खुबी अशी आहे की विठ्ठल मूर्तीची, तीच्या उपासनेची, भक्तीची खूण मात्र मनातून लोपली नाही.
रुप सामावले दर्शन ठाकले
अंग हारपले ते चि भावी
माझे रुप आता ईश्वराच्या रुपात सामावून गेले आहे. आता दर्शनही विरळ झाले असून सर्वांग हरपून गेले आहे. देह उरला नाही अशी माझी दशा झाली आहे! महापुरानंतर जसे उगम नाही, ओघ नाही, संगम नाही; सर्वच जलमय होते. तव्दत ईश्वर दर्शनानंतर आता पाहण्यासारखे, बोलण्यासारखे, करण्यासारखे काहीच शिल्लक नाही. मती कुंठित झाली आहे. नवलाची, आश्चर्याची गोष्ट ही की आता जाणायचे काहीच शिल्लक नाही इतके ज्ञान स्पष्ट आहे. आत्तापर्यंत हृदयात आत्मरुपाने ईश्वराला पाहात होतो. पण श्रीगुरुंच्या बोधाचा चमत्कार असा की आज देहाचे अंगअंगच तो बनला आहे. आदि तोच आहे, अंती तोच आहे आणि मधेही घनदाट तोच भरला आहे.
सुंदर सुरेख ओतिले, परब्रह्म तेज फांकले
ते व्योमीं व्योम सामावले, नयनी वो माये
ज्ञानयोग्यांसाठी ब्रह्म म्हणजे फुलझाडाचे बीज आहे. ध्यानयोग्यांसाठी परमेश्वर म्हणजे फुलझाडाची कळी आहे. आम्हा भक्तांसाठी सगुण साकार, विश्वव्यापक विष्णु म्हणजे उमललेले फूल आहे. त्याच्या परिमळाने ही सर्व सृष्टी दरवळून गेली आहे आणि त्याच्या कांतीने अवघे विश्व रमणीय झाले आहे. कमल नयनाची ती दिव्य कांती आज माझ्या डोळ्यात सामावून गेली आहे. ब्रह्मानंदाने सारी सृष्टी व्यापल्यामुळे संसाराला राहायला जागाच उरली नाही. वेद म्हणजे मधाने भरलेला ज्ञानसागर. ईश्वराचे गुणगान गाऊन अक्षरक्ष ते वेद थकले व ‘नेती नेती’ म्हणून स्वस्थ बसले. कारण बोलण्यासारखे ते स्वरुपच नाही जे आज मी पाहिले.
स्व-रुपाचेनि भानें बिंब हे ग्रासिलें
परी खूण न बोले काय करुं
ईश्वर स्वरुपाच्या अनुभूतीबरोबर संपूर्ण जगदबिंब ग्रासल्यासारखे झाले. मला काहीच दिसेनासें झाले. की वेगळेच काही दिसू लागले? पण त्याची अशी काहीच खूण सांगता येण्यासारखी नाही. आरशातले प्रतिबिंबीत रुप, रुपाशिवाय पाहिले हे नवल घडले. दृष्य आणि दृष्टा वगळून केवळ दर्शनच उरले. जिकडे जावे तिकडे तेच सोबत आहे. त्याला उदय नाही आणि अस्तही नाही; समाधी आणि उत्थान ही भानगड नाही. येथे कोणतीही व्दैत स्थिती नाही. एकच एक विठ्ठल आहे आणि तो सुखाचा अनुभव मी अखंडपणे भोगत आहे.
सुखाचा निधी सुखं सागर जोडला
म्हणोनि काळा दादुला मज पाचारी गे माये
प्रेम नव्हाळी मज जाली दिवाळी
काळे वनमाळी आले घरा गे माये
बाप रखुमादेवीवरु पुरोनि उरला
सबाहेजु भरला हृदयी गे माये
तो आनंदाचा ठेवा, आनंद समुद्र, सुख- स्वरुप सावळा विठ्ठल आज मला परिपूर्ण वश झाला आहे. तोच माझ्याकडे येऊन मला हाका मारीत आहे. माझ्यासाठी आज खरोखरच दिवाळी आहे. प्रेमाची ही केवढी नवलाई ! संसाराच्या गावाबाहेर ज्याचा संचार तो वनमाळी आज माझ्या घरी आला आहे. घरी येऊन त्याने सारे घर व्यापून टाकले आहे तरीही तो उरला आहे. शेवटी त्याने माझे हृदय अंतरबाह्य भरुन टाकले.
आकाशाच्या निळ्या पटलावर पाण्याने भरलेले काळे मेघ जसे खुलून दिसतात, तसे मला त्याचे रुप दिसले. तो तर निर्गुण! त्याला रुप कसले? पण आकाश तरी कोठे आहे? ते तर भले मोठे शून्य. त्या शून्यवत अवकाशात निळा रंग उमटतो आणि तोच मेघाच्छादित होऊन काळाभोर बनतो; तसा तो निर्गुणाचा (शून्याचा) सगुण (आकाश) आणि सगुणाचा सुंदर साकार (मेघ) बनलेला श्याम.. तो माझ्या दृष्टीत जिरुन गेला ! ज्ञानदेव म्हणतात, श्रीगुरुंच्या कृपेने मला ही दृष्टी लाभल्यामुळे ‘भेद’ आणि ‘अभेद’ याचे कोडे उलगडून मला त्याचे आत्मरुपाने निरंतर दर्शन घडत असते.
‘योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी’ असे म्हणणाऱ्या ज्ञानदेवांनी नेमका कोणाला पाहिला? त्याला पाहता पाहता ते अंतर्मुख कसे झाले? आणि त्यातून त्यांना झालेला आत्मसाक्षात्कार याच केलेलं हे चिंतन म्हणजे ज्ञानदेवांच्या विवेकबुध्दीला आणि प्रतिभेला आलेला बहर आहे. ज्ञानदेवांच्या शब्द सामर्थ्याचे गुणवर्णन करायला माझे शब्द खूपच थिटे पडतील. त्यांच्याच शब्दात मी म्हणेन.. ‘हे शब्द नव्हे कल्होळ अमृताचे’ !
जपी, तपी, ज्ञानी, ध्यानी, योगी यापैकी कोणालाही जे दृष्टीस पडले नाही ते ईश्वरी तत्त्व ज्ञानदेवांच्या नयनी सामावले आहे. ज्ञानदेवांचा हा चमत्कार म्हणावा का ? अहो, चमत्कार कसला ! हा तर ‘कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा’.. ज्ञानदेव हेच प्रत्यक्ष ब्रह्म आहे !!
|| राम कृष्ण हरी | भवःतू सब मंगलम ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]