दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । फलटण । जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अंधार कोठडी ओलांडून उजेडात प्रवेश केला पाहिजे. सामान्यपणे रोजच्या जगण्यातही सर्वांचा हाच अनुभव आहे. जसे की अंधार असलेल्या ठिकाणी आपल्या सोबत प्रकाशमान असे काही नसल्यास चाचपडत चालावे लागते. अगदी तसेच जेंव्हा आपल्या जीवनात चाचपडण्याची वेळ येते तेंव्हा समजावं की, आपल्या हाती प्रकाश दाखवणारी कोणतीही गोष्ट नाही. रोजच्या जगण्यातील हे चाचपडणं म्हणजे अंधारातून चालणं आहे. येथे अंधार हा अज्ञानाचे व प्रकाश हा ज्ञानाचे प्रतीक आहे. ज्याला लौकिकार्थाने सुखी, समृध्द जीवन जगायचे आहे त्याने ज्ञान संपादन केले पाहिजे. ज्ञान हे उपजत नाही, ते प्राप्त करावे लागते. जन्माला येतो तेंव्हा प्रत्येक देह निर्विकार असला तरी तो अज्ञानमूलक असतो. पुढच्या प्रत्येक टप्प्यावर जे ज्ञान मिळते त्याचा स्त्रोत म्हणजे गुरु. म्हणूनच वारकरी सांप्रदायाने गुरु परंपरेला सर्वोच्च महत्व दिले आहे. ‘गुरु तेथे ज्ञान’ हा ज्ञानेश्वर महाराजांचा व ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’ हा तुकाराम महाराजांचा विचार प्रवाह आपल्याला गुरु महात्म्याचे दर्शन घडवतो.
ज्ञानाच्या कक्षेत आल्यावर जीवन आमूलाग्र बदलते. मनाला नाविन्याची ओढ लागते. मग विशेष ज्ञान, ज्ञानाचे मुलतत्व आणि नंतर ‘ज्ञान’च समजून घेण्याची वृत्ती तयार होते. येथे सद्गुरुंच्या कृपेची गरज असते. एकदा का सद्गुरुंचा कृपाशिर्वाद झाला की संपूर्ण जीवन प्रकाशमान होते, अंधार कायमचा दूर होतो. सद्गुरु आपल्याला संसारपुरातून तारुन नेतात आणि ज्याच्या हृदयात सद्गुरु आहेत त्यांच्या मनात विवेकबुध्दी जागृत होते. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यावर दृष्टीला विशेष सामर्थ्य प्राप्त होते त्याप्रमाणे सद्गुरुंच्या स्पर्शाने साधकाला दिव्य ज्ञान प्राप्त होते. सामान्य माणसाच्या हातात चिंतामणी आल्यावर जसे त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात त्याप्रमाणे सद्गुरुंच्या कृपेनें शिष्याचे संपूर्ण जीवन ‘तृप्त’ होऊन जाते. म्हणून साधकाने श्रीगुरुंची भक्ती करावी व त्यायोगे कृतार्थ होऊन जावे; ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातल्यानंतर साहजिकच फांद्या, पाने, फुले टवटवीत होतात व ते झाड फळांनी बहरुन येते. तव्दत एका श्रीगुरुंच्या पूजनाने साधकाचे अवघे जीवन परिपूर्ण होऊन जाते. ज्ञानेश्वर महाराज यासाठी खूप सुंदर उदाहरण देतात.. वसंत तेथे वने | वने तेथे सुमने |सुमनी पालिंगने | सारंगाची || ‘ज्या वनामध्ये वसंत ऋतूचे आगमन होते त्या वनातील झाडे झुडपे बहरास येतात. असे बहरलेले वन फुलांनी सुगंधित होते; मग त्या फुलांवर भ्रमरांचे समुदाय वस्तीला येणारच.’ ज्याच्या जीवनात वसंतरुपी सद्गुरुंचे आगमन होते त्याचे जीवन अलौकिक होणारच.
श्रीगुरु हे ज्ञानाचे सागर आहेत, श्रीगुरु हे शुध्द ज्ञानाचे भांडार आहेत. जेथे शुध्द ज्ञान आहे तेथे आत्म्याचे प्रत्यक्ष दर्शन आहे. आणि आत्मदर्शनामध्ये दुःखनिवृत्तीपूर्वक समाधान आहे. सद्गुरु हे ज्ञानसूर्य आहेत, जेथे सूर्य तेथे प्रकाश असतोच. म्हणून ज्याला आपले जीवन प्रकाशमान करायचे आहे त्याने श्रीगुरुंच्या चरणी नतमस्तक व्हावे, किंबहुना आयुष्यभर विद्यार्थीदशा समजून गुरुंच्या म्हणजेच ज्ञानाच्या शोधात राहावे हाच वारकरी सांप्रदायाच्या गुरु परंपरेचा संदेश आहे. जो प्रकाशाचा वाटसरु होईल तो ज्ञानाच्या कक्षेत जाईल. जो प्रकाशाच्या वाटेवरुन चालणार नाही त्याचे जीवन अंधारात चाचपडणाऱ्या दिवाभीताप्रमाणे संकटात चाचपडत राहील…
‘आपण प्रकाशाचे वाटसरु होऊया, अवघे जीवन उजळून टाकूया’ !!’
|| राम कृष्ण हरी || भवःतू सब मंगलम ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]